बेळगाव लाईव्ह : सध्या पावसाचा जोर अधिक वाढला आहे. परिणामी सखोल भागात, नाले – गटारींमध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्याने अशा परिसरात धोका निर्माण होत आहे. बेळगावमधील नानावाडी भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौकानजीक असलेल्या नाल्याचीही अशीच अवस्था झाली असून नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या नाल्यात पाणी साचले आहे.
सध्या डेंग्यू – मलेरिया यासारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून याचाही धोका निर्माण झालाच आहे. अशातच नाल्यात साचलेल्या पाण्यामुळे या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. नाल्यात साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्याचे लक्षात येताच या भागातील सेवानिवृत्त शिपाई अशोक यल्लाप्पा कोरवी यांनी या नाल्यात उडी घेऊन पाण्याला वाट करून दिली.
लहान मुलांचा वावर, वाहनांना होणारा त्रास हि बाब लक्षात घेऊन आपण पुढाकार घेतल्याचे ‘बेळगाव लाईव्ह’ शी बोलताना त्यांनी सांगितले. जवळपास ७० फूट रुंद आणि १५० फूट खोल असलेल्या या नाल्यात त्यांनी उडी घेऊन पाण्याचा निचरा करण्यास मार्ग करून दिला.
या समस्येबाबत अनेकवेळा महानगरपालिका प्रशासनाला निवेदने देण्यात आली. अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. या भागातील कॅंटोन्मेंट हद्दीत येणाऱ्या गटारीचे गेल्या १० ते १२ वर्षात स्वच्छता करण्यात आलेली नाही.
लक्ष्मी टेक, फायरिंग रेंज भागातून येणारे पाणी याच भागातून वाहून पुढे मराठा कॉलनीत जाते. परंतु याठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या गटारी या अशास्त्रीय पद्धतीने निर्माण करण्यात आल्या आहेत. शिवाय देखभालीसाठी प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने या भागात हि समस्या उद्भवल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
सध्या पावसाळ्यातील साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. डेंग्यू मलेरियासारख्या आजाराचे सावट घोंगावत आहे. अशा परिस्थितीत संबंधित प्रशासनाने निदान अशा समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे, नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी आणि नागरिकांनीही बेजबाबदारपणाने कचरा इतरत्र फेकण्या ऐवजी सकाळी येणाऱ्या घंटागाडीतच द्यावा अशी प्रतिक्रिया जागरूक नागरिक व्यक्त करत आहेत.