बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर कृष्णा नदीच्या काठावर पूर येण्याची भीती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाटात पावसाचा जोर वाढला असून, बेळगाव जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीपलीकडील जमखंडी-मिरज राज्य महामार्ग बंद करण्यात आला आहे.
कुडची उगारखुर्द मध्येला जोडणारा पूल पूर्णत: बुडाला आहे.कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणारा दुवा असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील कुडची पुलावर रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेडिंग करण्यात आले आहे त्यामुळे या रस्त्यावरील रहदारी बंद झाली आहे.
या पुलावरून दररोज शेकडो बस आणि वाहने ये-जा करतात. हा महत्त्वाचा राज्यमार्ग असल्याने पुलाजवळ पोलिसांनी बॅरिकेड लावले आहेत. कुडाची पोलीस ठाण्याकडून पुलावर बॅरिकेड लावण्यात आले आहे.
कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. धोक्याच्या पातळीवरून वाहत असलेल्या कृष्णा नदीत १ लाख ४५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कोटणा जलाशयातून अचानक पाणी सोडल्याने कृष्णा नदीच्या काठावर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
आता पुराची स्थिती दिसून येत असून नदीचे पाणी आपली जागा सोडून बाहेर वाहू लागले आहे. कृष्णा नदीची आवक 1.50 लाख क्युसेक असून आलमट्टी जलाशयातून तेवढेच पाणी सोडले जात असल्याने सध्या पुराची भीती नसल्याचे स्पष्ट आहे मात्र आगामी दिवसात पाऊस वाढल्यास पूर येऊ शकतो.