बेळगाव लाईव्ह विशेष :वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी सीमा आंदोलनात भाग घेणारा अवलिया निष्ठावंत कार्यकर्ता आज पडद्याच्या काळाआड गेला, त्याबद्दल थोडक्यात….!
भाषावार प्रांतरचना करतांना १९५६ साली झालेला सिमावासिया वरील अन्याय प्रत्येक तरुणाच्या अंगात एक धगतधगता निखारा म्हणून पेट घेऊ लागला, १९६५ च्या दरम्यान याच आंदोलनाचा भाग म्हणून येळ्ळूर येथे रेल रोको करण्यात आला होता, यामध्ये अवघ्या वयाच्या १२ व्या वर्षी एक बालक सहभागी झाला होता तो म्हणजे हंदीगनूर ता.बेळगाव येथील सुपुत्र निंगोजी हुद्दार, तेंव्हा पासून या आपल्या तारुण्यात असो वा पुढील काळातील जीवनात सीमाप्रश्नी प्रत्येक लढयात अग्रस्थानी राहून नेतृत्व करण्यात कुठेही मागे न राहता आपल्या मुलुख मैदानी वाणीतून सर्वांना प्रेरणा देणारा प्रवास बुधवारी 17 जुलै 2024 रोजी निंगोजी हुद्दार यांच्या निधनाने थांबला.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वात जेंव्हा १९८६ साली कन्नडसक्ती आंदोलन झाले त्यावेळी या युवकाने आपले सर्वस्व झोकून दिले व तुरुंगवास भोगला, बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची अध्यक्ष या नात्याने धुरा सांभाळत असतांना संघटना बांधणीमध्ये व लोकप्रतिनिधी निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
२००६ पासून ज्या ज्या वेळी कर्नाटक सरकारचे बेकायदेशीरित्या अधिवेशन भरले त्याला प्रत्युत्तर म्हणून सिमावासीयांचा महामेळावा अयोजिला जातो त्यामध्ये कै. प्रा.सीमालढ्याचे अग्रणी नेते भाई एन.डी.पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून हे मेळावे यशस्वी केले. २००९ साली याच संदर्भात त्यांनी इतर नेत्यांबरोबर तुरुंगवास भोगला. मध्यवर्ती समितीचे माजी अध्यक्ष कै. वसंतराव पाटील यांच्या बरोबरीने तालुका समितीची धुरा त्यांनी अगदी यशस्वीपणे सांभाळली व सीमाप्रश्नी प्रत्येक शिष्टमंडळात त्यांचा सहभाग होता.
जेष्ठ नेते कै.एन डी पाटील यांचा खंदा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती बहुजन समाज शेतकरी कामगार पक्षातील आंदोलनात त्यांचा सहभाग असायचा. शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक आंदोलनात सहभागी होत शेतकऱ्यांच्या प्रश्नाना वाचा फोडली.
सीमाभागातील तरुणांना प्राथमिक शिक्षणानंतर माध्यमिक शिक्षण मिळावे म्हणून गावकरी मंडळी बरोबर गावात सरस्वती हायस्कूल ची स्थापना केली व अध्यक्षपदही भूषविले.
पूर्वी तात्कालीन पंतप्रधान कै. इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग, व्हीं व्हीं गीरी, माजी पंत प्रधान पी वही नरसिंह राव , गृह मंत्री यशवंत राव चव्हाण माजी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, विलासराव देशमुख आदिंशी सीमा प्रश्नावर केलेल्या चर्चेत शिष्टमंडळात त्यांचा सहभाग होता. सर्वोच्य न्यायालयात दाखल केलेल्या याचिके वेळी देखील त्यांचा माजी आमदार कै. बी आय पाटील यांच्या सोबत पाठपुरावा महत्वाचा होता.
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची मुलुख मैदान तोफ म्हणून तरुणांच्या मनात स्फुरण भरणाऱ्या निंगोजी हुद्दार यांची पोकळी भरून निघणे कठीणच आहे. अश्या या लढवय्या नेत्यास टीम बेळगाव लाईव्ह कडून आदरांजली!!