बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना अंमलात आणली असून या योजनेसंदर्भात आज मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र एकीकरण समिती शिष्टमंडळाची बैठक पार पडली.
यावेळी मंगेश चिवटे यांनी या योजनेसंदर्भात महत्वपूर्ण माहिती दिली. या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले असून तातडीने उत्पनाचे दाखले उपलब्ध होणार आहेत. या योजनेसाठी अर्ज करताना रुग्णाला दाखल केल्यानंतर तातडीने अर्ज करणे गरजेचे आहे.
या योजनेसाठी महाराष्ट्रातील अधिकारी संवेदनशीलपणे कार्यरत असून या योजनेअंतर्गत नवजात अर्भकांच्या आजारांवरील उपचार, शस्त्रक्रिया देखील करण्यात येत आहेत. हृदयविकारावरील शस्त्रक्रियेसाठी १ लाख रुपयांची मदत, मेंदू, कर्करोग, महिलांमधील स्तनांचे कर्करोग, यासाठी वार्षिक ५०००० रुपयांचे आर्थिक सहायय, डायलिसिस साठी ५० हजार, तर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी पहिल्या टप्प्यात २ लाख आणि वाढीव १ लाख रुपयांपर्यंतचे साहाय्य करण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आता महाराष्ट्रातील मंत्रालयात जाण्याची गरज नसून बेळगावमधील अरिहंत, के एल इ रुग्णालय तसेच इतरही काही रुग्णालयांमध्ये उपचार घेता येणार आहेत.
या योजनेसाठी निशुल्क प्रक्रिया राबविण्यात येत असून अत्यंत सुलभ प्रक्रिये अंतर्गत आपण अर्ज करू शकता. या योजनेच्या अधिक माहितीकरिता महाराष्ट्र शासनाच्या ८६५०५६७५६७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती मिळविता येते. सीमाभागातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिफारस पत्र जोडणे आवश्यक आहे, अशी माहिती मंगेश चिवटे यांनी दिली.
यावेळी समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, रणजित चव्हाण पाटील, मालोजी अष्टेकर, नेताजी जाधव आदी उपस्थित होते.
865 गावात या गावचा समावेश करा
निपाणी येथील आप्पाचीवाडी गावच्या लोकानी आपले गाव हे सीमा भागातील महाराष्ट्राने मागणी केलेल्या 865 गावांमध्ये समाविष्ट केले नाही त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक योजनांचा लाभ मिळत नाही नाही. पूर्वी वेगळ्या ग्राम पंचायतीत असताना सुविधा मिळत होत्या असे यावेळी त्या ग्रामस्थांनी सांगितले त्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पत्रावर अर्ज द्या त्यावर नवीन जीआर करून त्या गावचा देखील समावेश करण्याच्या आश्वासन देण्यात आले.