बेळगाव लाईव्ह:गेल्या पाच दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौर सरिता कांबळे यांनी आज शुक्रवारी सकाळी बसवन कुडचीला भेट देऊन तेथील पूर सदृश्य परिस्थितीचा पाहणी दौरा केला.
बेळगाव महापालिकेच्या प्रभाग क्र. 48 अंतर्गत येणाऱ्या बसवंत कुडची गाव आणि परिसरात गेल्या पाच दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
पावसामुळे बागलकोट रोड या मुख्य रस्त्या शेजारी तसेच गावामध्ये ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचणे, गटारी तुंबने वगैरे विविध समस्या उद्भवल्या आहेत. याची दखल घेत महापौर सविता कांबळे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत आज सकाळी सदर गावाला भेट दिली.
यावेळी महापौरांनी गावाचा दौरा करून बागलकोट रोड या मुख्य रस्त्याशेजारी साचलेले पाणी, फुटलेला परंतु दुरुस्त करण्यात आलेला नाला, तुडुंब भरलेला तलाव, गावातील श्री कलमेश्वर मंदिर परिसर वगैरे भागांचा पाहणी दौरा केला.
या पाहणी दौऱ्या दरम्यान त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्या अनुषंगाने उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्यांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. याप्रसंगी नगरसेवक बसवराज मोदगेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.