बेळगाव लाईव्ह:शहरातील वडगाव येथील ग्रामदेवता श्री मंगाई देवीच्या यात्रेला उद्या मंगळवार दि. 30 जुलैपासून हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ होत असून आवश्यक सर्व पूर्व सिद्धता करून संपूर्ण वडगाव यात्रेसाठी सज्ज झाले आहे.
दरवर्षीप्रमाणे वडगावसह शहर परिसर, ग्रामीण भाग, विविध तालुके तसेच अन्य राज्यातील भाविक उद्या मंगळवारी साजऱ्या होणाऱ्या ग्रामदेवता श्री मंगाई देवीच्या यात्रेला हजेरी लावत लावणार आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस खात्याने श्री मंगाई देवी मंदिर आवार तसेच मुख्य रस्त्यावर मोक्याच्या जागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचप्रमाणे यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेकडून स्वच्छतेच्या कामाबरोबरच मुख्य मार्गासह विविध गल्लीतील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले आहे तथापि केवळ थातुरमातुर कामे करून न जाता चांगल्या पद्धतीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
श्री मंगाई देवी मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यासह येथील पाटील गल्ली, कारभार गल्ली, यरमाळ रोड, संभाजीनगर, विष्णू गल्ली, राजवाडा कंपाउंड, वझे गल्ली, चावडी गल्ली, बाजार गल्लीसह शहापूर -वडगाव मुख्य रस्ता, धामणे -वडगाव रस्ता मंगाईनगर आदी भागातील प्रमुख ठिकाणी हॅलोजनच्या प्रखर दिव्यांची व्यवस्था केली जात आहे. श्री मंगाई यात्रा काळात दरवर्षी पावसाची हजेरी असते. त्यामुळे मंदिरा आवारात चिखल निर्माण होऊन भाविकांना त्रास मनस्ताप सहन करावा लागत होता.
तथापि यंदा मंदिरा आवारात पेव्हर्स बसविण्यात आल्यामुळे यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांची चांगली सोय होणार आहे. यात्रेनिमित्त श्री मंगल मंदिराकडे जाणारा रस्ता तसेच आसपासच्या रस्त्यांशेजारी पूजेचे, साहित्य, खेळणी, खाद्यपदार्थ, मिठाई आदींचे स्टॉल्स मांडण्यात आले आहेत.
लहान मुलांसाठी खेळाचे पाळणे तसेच अन्य विविध खेळ आणि मनोरंजनाची साधने यात्रास्थळी दाखल झाली आहेत. एकंदर श्री मंगाई यात्रेच्या आज पूर्वसंध्येला यात्रा भक्तीभावाने उत्साहात साजरी करण्यासाठी वडगाववासियांची लगबग सुरू झाली आहे.