बेळगाव लाईव्ह:वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवीच्या यात्रेला आज मंगळवारपासून अपूर्व उत्साहात भक्तीभावाने प्रारंभ झाला आहे. त्यावेळी दोन दिवस होणाऱ्या यात्रेसाठी संततधार पाऊस सुरू असतानाही हजारो भाविक हजेरी लावत असून देवीच्या मंदिर परिसरातील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवीची यात्रा म्हणजे बेळगावचा एक लोकोत्सवच असतो. या यात्रेचा आज मंगळवारी पहिला दिवस असल्यामुळे सकाळपासून देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. सकाळी देवीच्या मंदिरात पारंपरिक ढोल वाद्य वाजवून विधिवत विशेष पूजा झाल्यानंतर मानकरी चव्हाण पाटील बंधूंकडून गाऱ्हाणे उतरवून तसेच पूर्वापार परंपरेनुसार देवीच्या नावाच्या जयघोषात यात्रेला प्रारंभ करण्यात आला.
गाऱ्हाणे उतरवल्यानंतर देवीची ओटी भरणे वगैरे धार्मिक कार्यक्रम सुरू झाले. देवीचे दर्शन घेण्यासाठी तसेच ओटी भरण्यासाठी मंदिरासमोर स्त्री-पुरुषांच्या वेगवेगळ्या स्वतंत्र अशा लांबच्यालांब रांगा लागलेल्या पहावयास मिळत होत्या. सदर यात्रेनिमित्त आज वडगावातील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. त्याचप्रमाणे हार फुलांच्या व पूजेच्या साहित्याच्या स्टाॅल्ससह खेळणी, खाद्यपदार्थ, गृहपयोगी साहित्य, स्त्रियांच्या शृंगाराचे साहित्य वगैरेंच्या स्टॉल्सनी मंदिर परिसरातील बाजारपेठ सजली आहे. या ठिकाणी खरेदीसाठी एकच गर्दी होताना पहावयास मिळत आहे.
ग्रामदेवता श्री मंगाई देवीची यात्रा ही वडगाव मधील जनतेच्या मनात वसलेली यात्रा आहे. शेती पिकून पीक पाणी चांगलं होऊ दे. सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे, अशी मनोकामना यात्रेनिमित्त प्रत्येक जण देवीकडे व्यक्त करत असतो. एकंदर श्री मंगाई देवी मंदिराच्या स्वरूपात वडगाव आणि परिसरातील जनतेला आपल्यावर येणाऱ्या संकटांना वाचा फोडण्यासाठी एक ठिकाण प्राप्त झाले आहे. गेल्या कित्येक वर्षाची परंपरा असलेली ही यात्रा आजपासून सुरू झाली. वडगावची जनता दरवर्षी आपल्या ग्रामदेवतेच्या या यात्रेची आतुरतेने वाट पाहत असते. सासरी गेलेल्या नवविवाहिता सदर यात्रेच्या निमित्ताने माहेरी येत असतात. त्याचप्रमाणे मित्रमंडळी आणि विखुरलेले नातेवाईक एकत्र येतात आणि अशा पद्धतीने होणारी ही यात्रा म्हणजे एक प्रकारचा लोकोत्सवच असतो. या लोकोत्सवातून लोकांची मने एकत्र येतात आणि सुखदुःखाची उजळणी होते.
बेळगावातील मोठ्या प्रमाणात भरणारी ही यात्रा असून स्थानिक शहर परिसरातीलच नव्हे तर गोवा, महाराष्ट्र वगैरे परराज्यातूनही असंख्य भावीक या यात्रेला हजेरी लावत असतात. यात्रेनिमित्त येथील बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असते. सध्या हेच चित्र वडगाव येथे पहावयास मिळत आहे. याबरोबरच लहान मुलांचे खेळाचे पाळणे तसेच अन्य मनोरंजनात्मक खेळाचे साहित्य यात्रास्थळी दाखल झाले असून त्या ठिकाणी बाळगोपाळ खेळणी व खेळांचा आनंद लुटताना पहावयास मिळत आहे.
त्याचप्रमाणे सध्या श्री मंगाई देवी परिसरातील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. यात्रेसाठी मोठ्या संख्येने वाहने घेऊन येणाऱ्या भाविकांमुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र दिसून येत होते. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी ठिकठिकाणी रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत.
श्री मंगाई देवी मंदिराच्या ठिकाणी यात्रेसंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना यात्रा कमिटीच्या एका ज्येष्ठ सदस्यांनी सांगितले की, पाटील गल्ली, वडगाव येथील श्री मंगाई देवस्थानाच्या यात्रेची परंपरा फार म्हणजे फार पूर्वीपासून चालत आली आहे. श्री मंगाई देवी यात्रेच्या महिनाभर आधी गाऱ्हाणे घातले जाते. त्यानंतर सव्वा महिन्याने यात्रेची सांगता मंगळवारी केली जाते. त्यादिवशी गाऱ्हाणे उतरवून भाविकांना देवीला बकरी वगैरे पशु बळी देण्याची संमती मिळते.
तोपर्यंत म्हणजे सव्वा महिना होईपर्यंत गावात कुठेही बकरे कापणे, नारळ फोडणे वगैरे काहीही होत नाही. श्री मंगाई देवीचा महिमा मोठा असून तिच्यावर लोकांची प्रचंड श्रद्धा आहे. ही देवी नवसाला पावणारी आहे असे स्पष्ट करून त्यांनी श्री मंगाई देवी यात्रेच्या आजच्या पहिल्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. तसेच यावेळी यात्रा आज व उद्या अशी दोन दिवसाची असणार आहे. कारण गुरुवारी मध्यरात्रीनंतर आणि शुक्रवारी अमावस्या आहे. परंपरेनुसार अमावस्या लागली की यात्रेनिमित्त बकरी वगैरे पशुबळी देणे बंद केले जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.