बेळगाव लाईव्ह विशेष : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली पासून जवळच असलेल्या कुंभवडे गावात नयनरम्य धबधबा आहे. .या धबधब्याचे आगळे वेगळे वैशिष्ट्य असून हा धबधबा दोन्ही बाजूंनी पाहता येतो. यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
महाराष्ट्र – कर्नाटकाच्या सीमेवर असणारा हा धबधबा बेळगावपासून ८७ किमी अंतरावर आहे. हा धबधबा खाजगी मालमत्तेत असून याची मालकी महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत बाबासाहेब कुपेकर कुटुंबीयांकडे आहे.
या धबधब्याचं सौदर्य दोन्ही बाजूंनी पाहता येतं यामुळे धबधबा पर्यटकांना भूरळ घालत आहे. या धबधब्याचं आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे गुहेत राहून किंवा समोरुन अशा दोन्ही बाजूंनी डोळ्यादेखत पांढराशुभ्र फेसाळत कोसळताना धबधबा पाहायला मिळतो. दर वीकेंडला किंवा सुट्टीच्या दिवशी इथे मोठी गर्दी उसळून येते.
धबधबा परिसरात चहा-पानासाठी, अल्पोपहाराचे अनेक स्टॉल्स उभारण्यात आले असून या गावातील नागरिकांना या माध्यमातून रोगावर उपलब्ध झाला आहे. याठिकाणी भेट देण्यापूर्वी आगाऊ ऑर्डर घेऊन शाकाहारी, मांसाहारी जेवणाची घरगुती जेवणाची चव पर्यटकांना उपलब्ध करून दिली जाते.
याठिकाणी झालेल्या भूस्खलनानंतर धबधब्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे कुपेकर यांनी पर्यटकांना त्यांच्या मालमत्तेत जाण्यास मज्जाव केला होता. जनतेच्या सुरक्षेसाठी निर्बंध लादण्यात आले होते. मात्र तरीही अनेक पर्यटक निसर्गाचा हा नयनरम्य देखावा पाहण्यासाठी गर्दी करतात. हि बाब लक्षात घेऊन कुपेकर कुटुंबीयांनी योग्य रस्ते आणि सुरक्षेच्या उपाययोजना राबविल्या. सुरक्षारक्षक, विविध कर्मचाऱ्यांची नियुक्ती अशी पावले उचलण्यात आली.
पावसाळ्यात या भागात दरड कोसळण्याची शक्यता अधिक असते. यामुळे कुपेकर कुटुंबीयांनी सर्व सुरक्षिततेच्या उपाययोजना करून सदर मालमत्ता विकसित केली. यानंतर २०१७ जनतेसाठी येथे प्रवेश खुला करण्यात आला असून खर्च भागविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला ५० रुपये प्रवेश शुल्क आकारला जातो. पश्चिम घाटातील आणि आजूबाजूच्या अनेक ठिकाणी धबधब्यांवर प्रवेश बंदी केल्यानंतर, बाबा धबधब्याला भेट देणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे.
निसर्गाने बहरलेल्या आणि समृद्ध वनराई, वृक्षसंपदेने वेढलेल्या या भागात निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांना पश्चिम घाटाचे सार टिपण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात येते. याठिकाणी निवासी व्यवस्था उपलब्ध नाही. परंतु जर निवासासाठी याठिकाणाहून १८ किमी अंतरावर असलेल्या आंबोली येथे पर्यटकांना जावे लागते.