बेळगाव लाईव्ह :कर्ले (ता. जि. बेळगाव) बेळगाव येथील शंभरहून अधिक वर्षाची परंपरा असलेला दहीकाला उत्सव आज सोमवारी गावातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरासमोर अबालवृद्धांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात भक्तीभावाने पार पडला.
करले येथील हा दहीकाला आगळ्या पद्धतीचा असून दही कार्यासाठी श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या प्रांगणात मध्यभागी एक खांब रोवला जातो. या खांबाला वरच्या बाजूला तराजू प्रमाणे एक लांब लाकूड आडव जोडलं जातं, ज्याच्या एका टोकाला दह्याने भरलेले मडके अडकवलेले असते.
अबाल वृद्धांनी त्या लाकडी खांबाभोवती फेर धरून भजन म्हटल्यानंतर दही काल्याला सुरुवात होते. लाकडी उंच खांबावरील आडव्या लाकडाच्या टोकाला बांधलेले दह्याचे मडके उंच-खाली गोलाकार फिरवले जाते आणि ते मडके फोडण्यासाठी गावातील बालगोपाळ आणि युवकांमध्ये एकच चुरस लागते.
शतकांहून अधिक वर्षाची परंपरा असलेली ही दही काल्याची परंपरा आज सोमवारी देखील तितक्याच उत्साहाने पार पाडण्यात आली. दहीहंडी फोडल्यानंतर दह्याची चव चाखण्यासाठी आणि पवित्र मानले जाणारे फोडलेल्या मडक्याचे तुकडे गोळा करण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली होती.
या दही काल्यानिमित्त गावातील वारकऱ्यांनी रितीनुसार श्री मरगाई मंदिरापर्यंत हरिनामासह पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम या गजरात टाळ मृदंगाच्या तालावर सवाद्य दिंडी काढली.
यावेळी दिंडीच्या मार्गावर गावातील सुहासिनींनी दिंडीची आरती केली. एकंदर दरवर्षी गावातील वारकऱ्यांच्या पंढरपूर येथील आषाढी वारी नंतर होणारा दही काल्याचा हा उत्सव आज आबालवृद्धांच्या दरवर्षीप्रमाणे अभूतपूर्व उत्साहात भक्तीभावाने पार पडला.