बेळगाव लाईव्ह:आझाद गल्ली, कडोली येथील एका मतिमंद मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या गुन्हेगार युवकाला कठोर शिक्षा दिली जावी, अशी मागणी कडोली गावातील मुस्लिम जमातीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून आम्ही पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत, असे स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आज शुक्रवारी सकाळी मोठ्या संख्येने जमलेल्या कडोली (ता. जि. बेळगाव) गावातील मुस्लिम बांधवांनी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
कडोली गावामध्ये गेल्या बुधवारी घडलेल्या मतिमंद मुलीवर अतिप्रसंग करण्याच्या नींद घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. आमचा संपूर्ण मुस्लिम समुदाय त्या पीडित मुलीच्या पाठीशी आहे. गुन्हेगाराला कोणतीही दया न दाखवता त्याच्यावर थेट कायदेशीर कारवाई करून त्याला कठोर शिक्षा दिली जावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना कडोलीचे माजी ग्रा. पं. सदस्य हरून तहसीलदार म्हणाले की, आझाद गल्ली, कडोली येथील एका मतिमंद मुलीवर समीर धामणेकर या युवकांने जो अतिप्रसंग करण्याचा नींद प्रयत्न केला त्याचा आम्ही कडोली ग्रामस्थ मुस्लिम जमात कमिटीच्यावतीने तीव्र निषेध करतो.
या पद्धतीची निंदनीय घटना कोठेही कोणत्याही समाजात घडू नये. ज्या युवकाने कडोली येथील कृत्य केले आहे त्याला कायद्यातील कठोर कलमे लावून कडक शिक्षा केली जावी, अशी आमची मागणी आहे तसेच पीडित मुलीच्या कुटुंबीयांवर जो दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे, त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे, त्याबद्दल आम्ही आमच्या जमातीच्यावतीने मी त्यांची जाहीर माफी मागतो असे सांगून या प्रकरणात कडोली गावातील मुस्लिम जमात पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, हरून तहसीलदार यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी मकसूद पठाण, ख्वाजा बाणेदार, फारुख मजीद तहसीलदार, अल्ताफ तिगडी, जमीर पठाण आदींसह बहुसंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.