बेळगाव लाईव्ह : यंदा मान्सून समाधानकारक असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असूनही जून महिन्यात म्हणावा तितका पाऊस बेळगाव जिल्ह्यात झाला नाही.
मान्सून वेळेआधीच केरळ आणि कोंकण किनारपट्टीवर हजर होऊनही बेळगाव जिल्ह्यात मात्र लक्षणीय पाऊस झाला नसल्याचे निदर्शनात आले. जून महिन्यात बेळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी वळवाच्या पावसाप्रमाणे वातावरण दिसून आले असून काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन आठवड्यांपासून ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत असून अधूनमधून रिमझिम तर कधी पावसाच्या मुसळधार श्री पडत आहेत.
यंदा जून महिन्यात बेळगाव जिल्ह्यात अथणी तालुक्यात ७८.० मिमी, बैलहोंगलमध्ये ८९.० मिमी, बेळगावमध्ये २४०.० मिमी, चिक्कोडीमध्ये ८६.० मिमी, गोकाक ६९.० मिमी,
हुक्केरी १०२.० मिमी, कागवाड १०२.५ मिमी, खानापूर ३७६.० मिमी, कित्तूर २०१.२ मिमी, मूडलगी ५३.२ मिमी, निपाणी ७९.१ मिमी, रायबाग ७२.० मिमी, रामदुर्ग ६८.० मिमी आणि सौंदत्तीमध्ये ८७.० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
शेतशिवारातील हंगामासाठी हा पाऊस पुरेसा नसून अद्यापही काही भागात पाणी टंचाईची समस्या सुटलेली नाही. पावसाला सुरुवात होऊनही काही भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जून २०२४ मध्ये सरासरी १२४.३ मिमी पावसाची नोंद झाली असून मागील वर्षी जून महिन्यात केवळ ४७ मिमी पावसाची नोंद झाली होती.