बेळगाव लाईव्ह :पिरनवाडी येथील सरकारी मराठी व उर्दू शाळेजवळ कचऱ्याचे साम्राज्य, स्वच्छतागृहाला देखील गळती.. ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध होताच तासाभरात सदर ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून परिसराची साफसफाई करण्यात आल्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.
पिरनवाडी दर्ग्याजवळील जांबोटी रस्ते शेजारी मोठ्या प्रमाणात कचरा व घाणीचे साम्राज्य पसरले होते त्याचप्रमाणे या ठिकाणची गटार देखील तुंबून परिसरात अस्वच्छतेचे वातावरण पसरले होते. सदर बाब आज शुक्रवारी सकाळी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास आली. तेंव्हा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या अस्वच्छतेवर प्रकाश टाकला.
जांबोटी रस्त्याच्या दिशेने पिरनवाडी दर्ग्याजवळ सरकारी शाळेच्या शौचालयाची भिंत पडू शकते अशी माहिती आम्हाला मिळताच आम्ही तातडीने सर्वेक्षण केले आहे. सर्व प्रसारमाध्यमांनी आणि सरकारी अधिकाऱ्यांना त्वरित येथील सर्वेक्षण करण्याची विनंती. सांडपाणी पुढे सरकत नसल्याने येथील गटर साफ करणे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट कोणतीही घटना घडण्यापूर्वी शाळेच्या शौचालयाची भिंत पाडण्यात यावी.
तसेच रस्त्यावर टाकलेला कचरा प्राधान्याने हटवावा. येथील रस्त्यावर स्पीड ब्रेकर आणि शाळा झोन बोर्ड असणे आवश्यक आहे. येथील शाळेच्या आत स्वच्छतागृहाशेजारी स्वयंपाकघर आहे ते स्वच्छ सुरक्षित जागी स्थलांतरित केले जावे. ही समस्या उर्दू माध्यमाच्या शाळेत असून त्याच आवारात मराठी शाळा शाळाही आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी सोशल मीडिया प्रसिद्ध केली होती.
सदर माहितीची तात्काळ दखल घेत अवघ्या तासाभरात पिरनवाडी दर्ग्याजवळील जांबोटी रस्ते शेजारील कचऱ्याचे साम्राज्य हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी घाण व कचरा हटवून संपूर्ण परिसराची साफसफाई करून तेथे निर्जंतुकीकरणासाठी डीडीटी पावडरही टाकली.
त्याचप्रमाणे तेथील तुंबलेली गटार देखील गाळ व केरकचरा काढून स्वच्छ करण्यात आली. या पद्धतीने युद्धपातळीवर परिसर स्वच्छ करण्यात आल्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत असून ते संतोष दरेकर व त्यांचे सहकारी तसेच सोशल मीडिया माध्यमाला धन्यवाद देत आहेत.