बेळगाव लाईव्ह : पश्चिम घाटात झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील नदी, नाले, जलाशय, धबधबे यांना जीवदान मिळाले असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. गेल्या आठवड्याभरात झालेल्या दमदार पावसामुळे हिडकल (ता. हुक्केरी) येथील राजा लखमगौडा जलाशयाच्या पायथ्याजवळ असणाऱ्या होन्नूर परिसरातील विठ्ठल बिरदेव मंदिर पाण्याखाली गेले आहे.
महाराष्ट्र आणि पश्चिम घाटात संततधार पाऊस सुरू असून कृष्णा, मलप्रभा, घटप्रभा, वेदगंगा, दूधगंगा, हिरण्यकेशी, मार्कंडेय या नद्या मोठ्या प्रमाणात वाहत आहेत. १ जूनपासून झालेल्या पावसानंतर आजतागायत २६६ मिमी. पावसाची नोंद झाली असून 33 टक्के सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. १ जून ते ९ जुलै या कालावधीत ७८ मिमी पाऊस पडला असून मागील वर्षीच्या तुलनेत 43 टक्के इतकी अधिक पावसाची नोंद झाली आहे.
५१ टीएमसी कमाल साठवण क्षमता असलेल्या हिडकल जलाशयात ९ जुलै रोजी २१.१०५ टीएमसी पाणीसाठा होता, जलाशयात २५६७७ क्युसेक आवक झाली असून गतवर्षी यादिवशी ३००७ क्युसेक इतकी आवक होती तर ४.४७९ टीएमसी पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत १६.६२६ टीएमसी पाणी अधिक जमा झाले असून एकाच आठवड्यात १० टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.
हिडकल जलाशयाच्या बॅकवॉटरमध्ये असलेले पुरातनकालीन विठ्ठल मंदिर पाण्याखाली गेले असून संपूर्ण मंदिर पाण्यात बुडून केवळ मंदिराचा कळस दिसत आहे. जलाशयातील पाणीपातळीत आणखी चार फुटांनी वाढ झाल्यास मंदिर पूर्णत: पाण्याखाली जाईल. हे विठ्ठल मंदिर गेल्या वर्षी भीषण दुष्काळामुळे चर्चेत आले होते. पाऊस लांबल्याने महिनाभर येथे भाविकांचा प्रचंड ओघ सुरू होता. लाखो भाविकांनी मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले होते.
होन्नूर येथे परिसरातील जनतेने वंटमुरी देसाई यांच्या सहाय्याने १९२८ मध्ये मंदिराची उभारणी केली होती. मात्र, १९६४ मध्ये हिडकल जलाशयाचे बांधकाम हाती घेतल्यानंतर १९७७ मध्ये हे मंदिर पाण्याखाली गेले. यावेळी जनतेने राज्य सरकारच्या मदतीने जलाशयातील मंदिराच्या बांधकामास धक्का न लावता नवीन जागेत मंदिराचे स्थलांतर केले. ५१ टीएमसी क्षमतेच्या हिडकल जलाशयात १० टीएमसी पाण्याचा साठा झाल्यानंतर पाणी गाभाऱ्यापर्यंत येते. २० टीएमसी पाण्याचा साठा झाल्यावर कळसासह मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जाते.