बेळगाव लाईव्ह :श्रीलंकेमध्ये या महिन्यात होणाऱ्या दिव्यांगांच्या आंतरराष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेकरता भारतीय संघात निवड झालेला अष्टे (ता. जि.बेळगाव) गावचा दिव्यांग खेळाडू सुरज धामणेकर याची त्याच्या घरी भेट घेऊन सामाजिक कार्यकर्त्या साधना सागर पाटील यांनी त्याला स्पर्धेकरिता शुभेच्छा देऊन आर्थिक मदत केली.
श्रीलंकेमध्ये येत्या 8 ते 10 जुलै दरम्यान होणाऱ्या दिव्यांगांच्या आंतरराष्ट्रीय थ्रो बॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या बेळगावच्या सूरज धामणेकर, महांतेश होंगल, मन्सूर मुल्ला, सुरेश कुंभार, एरना होंडाप्पाण्णा, मनीषा पाटील व भाग्या मलाली या खेळाडूंनी प्रवास खर्च व इतर गोष्टी संदर्भात आर्थिक मदतीचे आवाहन केले होते.
त्याला प्रतिसाद देत सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांच्या नेतृत्वाखालील फेसबुक फ्रेंड्स सर्कलने (एफएफसी) पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्त्या साधना सागर पाटील यांनी आज बुधवारी सकाळी पावसाची तमा न करता अष्टे गावातील थ्रो बॉल दिव्यांग खेळाडू सुरज धामणेकर याच्या घरी जाऊन त्याची आणि त्याच्या माता-पित्यांची भेट घेतली.
तसेच सुरज याला आर्थिक मदत करून त्याला व इतर खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना सुरज धामणेकर याने आपल्या पालकांना मॅडमला भेटून खूप आनंद झाला. साधनामॅडम या पहिल्या व्यक्ती आहेत ज्यांनी आमच्या घरी भेट दिली आणि आमचा आत्मविश्वास वाढविला असे सांगून श्रीलंकेतील स्पर्धा जिंकून आपल्या गावाचे, राज्याचे व देशाचे नांव उज्वल करणे हे आपले स्वप्न असल्याचे सांगितले. तेंव्हा सामाजिक कार्यकर्त्या साधना पाटील यांनी त्याला आपला भारतीय राष्ट्रध्वज अभिमानाने भेट दिला.
श्रीलंकेतील स्पर्धेत भाग घेण्यासाठी सुरज धामणेकर व अन्य खेळाडू येत्या 6 जुलै रोजी रवाना होणार आहेत. त्यावेळी त्यांच्यासाठी कारची सोय करण्याचे आश्वासनही साधना सागर पाटील यांनी दिले. याप्रसंगी एफएफसीचे संतोष दरेकर व इतर उपस्थित होते.