बेळगाव लाईव्ह :खानापूरच्या भीमगड अभयारण्यातील रस्ता, वाहतुकीची सोय नसलेल्या आमगाव येथील एका प्रकृती अत्यवस्थ महिलेला गावकऱ्यांनी लाकडी गावठी स्ट्रेचर वरून खांद्यावर उचलून भर पावसात हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचाराचा फायदा न होता त्या महिलेचा नुकताच दुर्दैवी मृत्यू झाला.
सदर महिलेच्या मृत्यूस आमगाव येथे सरकारच्या कोणत्याही नागरी सुविधा नसणे आणि मुसळधार पाऊस या गोष्टी कारणीभूत असल्याने सरकारने तिच्या कुटुंबीयांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
आमगाव हे गाव खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्यात अतिशय दुर्गम भागात वसले आहे. आपला भारत विकसित भारत होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत असताना दुर्दैवाने आजतागायत आमगावमध्ये मात्र कोणत्याच नागरी सुविधा पोहोचलेल्या नाहीत. इतर नागरी सुविधा तर सोडाच सरकारने या गावासाठी साध्या रस्त्याचीही सोय केलेली नाही.
आमगावातील हर्षदा घाडी (वय 38) या महिलेची प्रकृती गेल्या 18 जुलै रोजी अतिशय बिघडली. तेंव्हा कोणत्याही सुविधा नसल्यामुळे गावकऱ्यांनी लाकडाचे गावठी स्ट्रेचर तयार केले. त्यानंतर त्या स्ट्रेचरवरून हर्षदाला खांद्यावर उचलून जंगलातून सुमारे 5 कि.मी. पायपीट करून नदी तीरावर आणले. पुढे तेथे थांबलेल्या रुग्णवाहिकेतून हर्षदा हिला हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल करण्यात आले.
हॉस्पिटलमध्ये पाच-सहा दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचाराचा फायदा न होता तिचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे ज्या लाकडी स्ट्रेचरवरून हर्षदाला उपचारासाठी आणण्यात आले होते, त्याच स्ट्रेचरवरून तिचा मृतदेह गावाकडे आणून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ दुर्दैवाने आमगाव ग्रामस्थांवर आली.
हर्षदा हिला लाकडी स्ट्रेचर वरून 5 कि.मी. पायी चालत उपचारासाठी नेण्यात येत असताना मुसळधार पाऊसही पडत होता. तथापि तिचा जीव वाचवण्यासाठी जंगलाची खडतर वाट तुडवत ग्रामस्थांनी तिला रुग्णवाहिकेपर्यंत आणले. मात्र त्यांच्या या संघर्षाला हर्षदाच्या मृत्यूमुळे यश मिळू शकले नाही. मयत हर्षदा हिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सरकारी अधिकारी आणि कांही लोकप्रतिनिधींनी त्यांना सहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
आपल्या गावापासून खानापूरपर्यंत संपर्क रस्त्याची सोय करावी या आमगाववासियांच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या मागणीकडे सरकारने आजपर्यंत दुर्लक्ष केले आहे. आमगावपासून जर खानापूर पर्यंत संपर्क रस्ता असता तर हर्षदाचा जीव कदाचित वाचला असता.
रुग्णवाहिका गावापर्यंत आली असती तर हर्षदाला लाकडी स्ट्रेचर वरून जंगलातून 5 कि.मी. अंतराची पायपीट करत नेण्याचे गावकऱ्यांचे कष्ट वाचले असते आणि वेळही वाया गेला नसता. हर्षदाला वेळेवर उपचार मिळू शकले असते.
मयत हर्षदा हिच्या कुटुंबाला सहाय्य मिळावे : संततधार पाऊस, संपर्क रस्ता नाही, गावाचे स्थलांतर करण्याच्या बाबतीत विचार करण्यास विलंब, एकंदर सरकारच्या दुर्लक्षामुळे खानापूरच्या जंगलातील आमगाव येथील हर्षदा घाडी या महिलेचा मृत्यू झाला आहे. तेंव्हा बेळगाव जिल्हा प्रशासन या महिलेच्या कुटुंबीयांना एनडीआरएफ, सीआरएफ मार्गसुचीनुसार 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देऊन दुःखाचा डोंगर कोसळलेल्या घाडी कुटुंबाला दिलासा देण्याचे मानवतावादी कार्य झाले पाहिजे. हे कार्य बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन करतील का? हे पहावे लागेल.