बेळगाव लाईव्ह :गोवा पोलिसांनी अलीकडेच बेळगाव येथील नसीर अहमद तिगडी आणि विजयपुरा येथील मोहम्मद हाजी या कर्नाटकातील दोन इसमांकडून चालवल्या जाणाऱ्या फसव्या भर्ती एजन्सीचा पर्दाफाश केला आहे.
पीडितांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई येथे भर्ती एजन्सी चालविणाऱ्या संशयीतांकडून मासिक 1 लाख रुपये पगाराच्या नोकऱ्याची ऑफर दिली जात होती. गोवा राज्य पोलीस आता या बेकायदेशीर भर्ती जाळ्यामध्ये आणखी कोण कोण गुंतलेले आहेत? याचा छडा लावण्याचा कामाला लागले आहेत.
पोलीस अधीक्षक (गुन्हे) राहुल गुप्ता यांनी आरोपींच्या मोबाईल फोनमध्ये दोषात्मक पुरावे आढळून आल्याचे सांगितले आहे. कंबोडिया, लावोस, म्यानमार आणि व्हिएतनाममध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबियांनाही पोलीस त्यांच्या प्रियजनांची तपासणी करण्याचा सल्ला देत आहेत.
त्याचप्रमाणे संबंधित देशातील सायबर गुन्हेगारीत जे कोणी गुंतले आहेत त्यांनी तात्काळ माघारी परतावे किंवा गोवा पोलिसांच्या कायदेशीर कारवाईला तोंड द्यावे. परदेशात नोकरीच्या संधी शोधताना सुरक्षित रहा आणि सावध रहा, असे आवाहनही गोवा पोलिसांनी केले आहे.