बेळगाव लाईव्ह:बेळगाव शहरवासियांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी परंपरेनुसार नेहमीप्रमाणे श्री गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात शांततेने साजरा करावा. विशेष म्हणजे यावर्षी मूर्तिकारांवर कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही, असे जिल्हा पालक मंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असल्याची माहिती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ बेळगावचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी दिली.
येत्या श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पालक मंत्र्यांशी भेट घेऊन विविध बाबींवर चर्चा केली.
या भेटीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना रमाकांत कोंडुसकर यांनी उपरोक्त माहिती दिली. ते म्हणाले की, आता मी श्री गणेशोत्सव आणि विविध समस्या संदर्भात श्री गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी प्रामुख्याने मूर्तिकारांना पीओपीच्या श्री मूर्ती संदर्भात जे भय वाटत होते ते भय आज दूर करण्यात आले आहे. श्री गणेशाच्या पीओपी मूर्तींवर बंदी घातली जाणार असे बोलले जात होते. त्या संदर्भात जिल्हा पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकडे विचारणा करून चर्चा केली असता. या उभयतांनीही परंपरेनुसार नेहमीप्रमाणे श्री गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात शांततेने साजरा करण्यास सांगितले आहे.
विशेष म्हणजे यावर्षी मूर्तिकारांवर कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही असे सांगून युवक मंडळ व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने देखील आपल्या हिंदू संस्कृतीचे भान ठेवून श्री गणेशोत्सव साजरा करावा. मूर्तिकार अथवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना कोणतीही समस्या अडचण निर्माण झाल्यास त्यानी गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन कोंडुसकर यांनी केले.
याप्रसंगी माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, सतीश गोरगोंडा सागर पाटील यांच्यासह श्री गणेशोत्सव महामंडळाचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.