बेळगाव लाईव्ह: सध्या पावसाचा जोर वाढला असल्यामुळे गाळ काढता येणार नसला तरी पुराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने किमान बळ्ळारी नाल्यातील प्रचंड प्रमाणात वाढलेल्या जलपर्णीचे ताबडतोब उच्चाटन करावे, अशी मागणी नाला परिसरातील समस्त शेतकऱ्यांच्यावतीने शेतकरी नेते राजू मरवे यांनी केली आहे.
सध्या पडत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव लाईव्हच्या प्रतिनिधीने आज शनिवारी सकाळी वडगाव शिवारात जाऊन शेतकरी नेते राजू मरवे यांची भेट घेतली. तसेच बळ्ळारी नाल्याची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते बोलत होते.
मरवे म्हणाले की, अलिकडे बळ्ळारी नाला हा येथील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरण्याऐवजी पुराच्या स्वरूपात मोठी समस्या ठरत आहे. पूर्वी ही समस्या नव्हती मात्र 2013 पासून पुराची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. पुना -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या ठिकाणी अडले जाणारे पाणी हे त्याचे कारण आहे. येळ्ळूर रोड येथील पुलाचा तळ खाली आहे आणि राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाचा तळ 6 इंच वर आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या ठिकाणी 1 इंच पाणी तुंबले तर येळूर रोडच्या ठिकाणी ते 1 फूट साचलेले असते.
परिणामी पावसाळ्यात बळ्ळारी नाल्याला पूर येऊन आसपासच्या शेतात पाणी घुसल्यामुळे शेत पिकांचे कोट्यावधीचे नुकसान होते. बळ्ळारी नाल्यासंदर्भात आम्ही अनेकदा सरकारलाही आणि स्थानिक अधिकाऱ्यांनाही निवेदन दिले आहे. निवेदन दिल्यानंतर जणूकाही समस्या सोडवणार असल्याच्या अविर्भावात अधिकारीवर्ग येऊन पाहणी करून जातो तो पुन्हा या ठिकाणी फिरकत नाही.
दरवर्षी उद्भवणारी बळ्ळारी नाल्याच्या पुराची समस्या पाहता वास्तविक सरकारने शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. स्मार्ट सिटी साठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात मात्र देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी कांही कोटी रुपये खर्च करण्यास काय हरकत आहे? आता पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे गाळ काढता येणार नसला तरी प्रशासनाने किमान या नाल्यात प्रचंड प्रमाणात वाढलेल्या जलपर्णी कडे गांभीर्याने लक्ष द्यावे. जेसीबीने या जलपर्णीचे उच्चाटन केल्यास शेतकऱ्यांना थोडा दिलासा दिल्यासारखे होईल.
राज्यातील विद्यमान सरकारला शेतकऱ्यांनी सत्तेवर आणले आहे. तेंव्हा या सरकारने त्वरित लक्ष देऊन बळ्ळारी नाल्याच्या आसपास असणाऱ्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी या नाल्यातील जलपर्णी युद्धपातळीवर काढून टाकण्याचे आदेश द्यावेत, अशी कळकळीची विनंती मी समस्त शेतकऱ्यांच्यावतीने करत आहे असे राजू मरवे यांनी शेवटी सांगितले.