बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरात स्मार्ट सिटी योजनेची अंमलबजावणी करण्यात आली मात्र अद्याप अनेक ठिकाणी मूलभूत सुविधा देण्यास देखील महापालिका प्रशासन अपयशी ठरलेले आहे याचे जिवंत उदाहरण बेळगाव शहरातल्या मध्यवर्ती भागातील कोनवाळ गल्लीचे देता येईल.
कोनवाळ गल्लीतील चिल्ड्रन हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला ड्रेनेजचे झाकण गेल्या तीन वर्षापासून बसविण्यात आलेले नाही त्यामुळे या भागातील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.
महापालिका यंत्रणेने 3 वर्षापूर्वी या ठिकाणीचे ड्रीनेज झाकण काढले होते मात्र याकडे दुर्लक्षच करण्यात येत आहे.स्थानिक नागरिकांनी यावर पर्याय म्हणून फरशी घातली होती मात्र पावसात ही फरशी देखील काढण्यात आली आहे त्यामुळे ड्रीनेज उघड्यावरच आहे. सदर झाकण उघडे असल्याने धोकादायक बनले आहे. याची दुरुस्ती व्हावी यासाठी शाळकरी मुलांसोबत असलेला झाकण काढलेल्या ड्रीनेजचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.
बेळगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 च्या व्याप्तीत येणारे ही समस्या स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर कधी आली नाही का? हा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.
बेळगाव महापालिका जर स्थानिक लोकांना मूलभूत सुविधा देण्यापासून अपयशी ठरत आहे हे या उघड्या ड्रीनेज झाकणामुळे समोर आलेले आहे. महापालिकेने याकडे लक्ष देऊन त्वरित झाकण बसवावे अशी मागणी युवा कार्यकर्ते बळवंत शिंदोळकर यांनी केली आहे अन्यथा प्रसंगी आंदोलन केले जाईल असाही इशारा देण्यात आला आहे.