बेळगाव लाईव्ह:खानापूर तालुक्यात सुधारित वैद्यकीय सेवा आणि वाहतूक पायाभूत सुविधांचा अभाव असल्याबद्दल डॉ. सोनाली सरनोबत यांनी चिंता व्यक्त केली असून त्या अनुषंगाने कांही सल्लेही दिले आहेत.
खानापूर तालुक्यातील हर्षदा घाडी या महिला रुग्णाची आज मंगळवारी डॉ सरनोबत यांनी केएलई हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन विचारपूस केली. या रुग्णाला आमगाव (ता. खानापूर) येथून अत्यंत गंभीर अवस्थेत बांबूच्या स्ट्रेचरच्या सहाय्याने हाताने तिरडी उतरल्याप्रमाणे उचलून आणण्यात आले होते. आमगाव येथून वाहतुकीची कोणतीही सोय नसल्याने या रुग्णाला प्रथम जांबोटी येथे व त्यानंतर केएलई हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. रुग्णाला भेटल्यानंतर डॉ सोनाली सरनोबत यांनी ऑन ड्युटी पीजीशी आणि संबंधित निवासी डॉक्टरांशी रुग्णाच्या रोगनिदानाबद्दल चर्चा केली. त्याचप्रमाणे रुग्ण हर्षदा घाडी हिला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
केएलई हॉस्पिटलला दिलेल्या आपल्या भेटीने खानापूर तालुक्यातील सुधारित वैद्यकीय सेवा आणि वाहतूक पायाभूत सुविधांची नितांत गरज अधोरेखित केल्याचे डॉ. सरनोबत यांनी म्हंटले आहे. आमगाव खानापूर येथील एका रुग्णाला वाहतुकीची सोय नसल्यामुळे गंभीर अवस्थेत बांबूच्या स्ट्रेचरवरून 3 -4 कि.मी. पायी चालत आणावे लागते ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
ही घटना खानापूर तालुक्यातील रहिवाशांना वेळेवर आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वाच्या आव्हानांना अधोरेखित करते. दळणवळणाच्या पायाभूत सुविधांच्या अभावामुळे रुग्णांना नाईलाजाने हाताने उचलून आणावे लागते. ज्यामुळे ग्रामीण दुर्गम भागातील रुग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो, असे डॉ. सोनाली सरनोबत यांनी सांगितले.
तसेच या संदर्भात डॉ. सरनोबत यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना खानापूर तालुक्यातील सुधारित वैद्यकीय सेवा आणि वाहतूक पायाभूत सुविधेच्या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची विनंती केली असून पुढील प्रमाणे सल्ले दिले आहेत.
1) ग्रामीण भागांना वैद्यकीय सुविधांशी जोडण्यासाठी रुग्णवाहिकांसह परिवहन सेवा वाढवणे. 2) ग्रामीण भागातील आरोग्यसेवा पायाभूत सुविधा आणि संसाधने सुधारणे. 3) टेलिमेडिसिन किंवा मोबाईल हेल्थ युनिट्स सारख्या नाविन्यपूर्ण उपायांचा अवलंब करावा. एकंदर सर्व व्यक्तींना त्यांच्या ठिकाणाची पर्वा न करता ताबडतोब आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी याकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत डॉ. सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केले आहे.