बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री तथा बेळगाव जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज खानापूर तालुक्यातील जांबोटी रोडवरील कुसमळी ब्रिजची पाहणी केली. खानापूर तालुक्यातील बहुतेक पूल पाण्याखाली गेले असून या पुलंना भेट देऊन तेथील सद्यस्थितीची त्यांनी पाहणी केली. वाहतुकीला धोकादायक बनलेल्या या ब्रिटिशकालीन पुलावरून अवजड वाहनांना संचार करण्यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने वेळापत्रक आखून देण्यात आले असून बेळगावमार्गे जांबोटीहून गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी देण्यात आलेल्या नियोजित वेळेमुळे सुरक्षित वाहतूक होण्याचा अंदाज आहे.
या पुलावरील सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकीवर त्वरित बंदी घालावी, अशा मागणीचे निवेदन येथील ग्रामस्थांसह काही संघटनांनी दिले होते. या निवेदनाची दखल घेऊन चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनीही या पुलाची पाहणी केली होती. या पुलावरून सर्व प्रकाराच्या अवजड वाहनांना वाहतुकीला बंदी घालण्याचा आदेश दिला होता. त्याची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने शनिवारपासून त्याची अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केला होता. मात्र जांबोटी-कणकुंबी विभागात सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे मलप्रभा नदीला पूर आला आहे. त्यामुळे पुलावरून होणाऱ्या संभाव्य धोक्याची दखल घेऊन,जिल्हा पालकमंत्र्यांनी या पुलाची पाहणी करून पर्यायी मार्गाने वाहतुकीला मार्ग उपलब्ध करून देण्याचा विचार सुरु असल्याचे सांगितले आहे.
जिल्ह्यातील संभाव्य अतिवृष्टी/पुराच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी शुक्रवारी खानापुर तालुक्यातील पूरग्रस्त व पावसाने नुकसान झालेल्या भागाला भेट दिली. .यावेळी मलप्रभा नदीच्या काठावरील हिरेहट्टीहोळी गावातील लोकांनी मंत्र्यांची भेट घेऊन संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती केली. तसेच या भागात उद्धवणाऱ्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी त्यांनी मंत्र्यांकडे केली.
खानापुर तालुक्यातील वनपरिक्षेत्रातील १५ गावांची यादी करण्यात आली असून त्यांना मुलभूत सुविधा देण्यात याव्यात. अन्यथा तेथील लोकांना स्थलांतरित करण्याचा विचार करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. नवीन रस्ता तयार करण्यासाठी वनविभागाची परवानगी नाही. अशा परिसरात शेकडो वर्षांपासून लोक राहात असून बंगळुरूमध्ये वनमंत्री आणि स्थानिक आमदारांसोबत यापूर्वीच बैठक झाली आहे. येथील स्थानिक परिस्थिती वनमंत्र्यांना समजावून सांगणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. 80 टक्के लोक सहमत असतील तर त्यांना इतरत्र हलवता येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. खानापूरच्या अनेक जुन्या पुलांवर खबरदारीचा उपाय म्हणून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तरीही राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याची दुरुस्ती आणि खानापूर ते गोवा राज्याच्या सीमेपर्यंत पूल बांधण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. पावसाळा संपल्यानंतर नवीन पूल बांधण्याची सूचना केली जाईल, असे ते म्हणाले.
यावेळी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अंजली निंबाळकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हापंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.भीमा शंकर गुळेद आदी उपस्थित होते.