बेळगाव लाईव्ह:डेंग्यूच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्नाटक संसर्गजन्य रोग कायदा 2020 अंतर्गत अधिकार वापरून एलिसा आणि रॅपिड कार्ड या चांचणीचे शुल्क निश्चित केले आहे.
राज्यातील सर्व खासगी हॉस्पिटल्स आणि खासगी प्रयोगशाळांना डेंग्यूच्या उपरोक्त चांचणीसाठी नवीन दर अंमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारने निश्चित दरानुसार डेंग्यू एलिसा एनएस1 या चांचणीची किंमत रु. 300, डेंग्यू एलिसा आयजीएमची किंमत रु. 300 आणि रॅपिड कार्ड चांचणीची किंमत रु. 250 इतकी असणार आहे.
दरम्यान, सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील डेंग्यूच्या रुग्णात पुन्हा वाढ झाली असून आतापर्यंत जिल्ह्यात डेंग्यूचे 117 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बेळगाव ग्रामीण मधील 20, तर बेळगाव शहरातील 26 रुग्णांचा समावेश आहे. डेंग्यू बरोबरच चिकन गुनिया आणि मलेरियाचे रुग्ण देखील आढळून येत असून आरोग्य खाते या रोगांना आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
गेल्या महिन्याभरात जिल्ह्यातील डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
यावेळी रुग्ण संख्या वाढली असली तरी सुदैवाने अद्यापपर्यंत एकाचाही डेंग्यूमुळे मृत्यू झालेला नाही. बेळगाव तालुक्यातील एका युवकाचा मृत्यू झाला आहे. मात्र तो डेंग्यूमुळेच झाला असल्याचे अजून निश्चित झालेले नाही.