बेळगाव लाईव्ह : आरोग्य विभागाच्या अहवालानुसार बेळगाव शहर आणि जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून गेल्या महिनाभरात दोघांचा या आजाराने बळी घेतला आहे तर इतर ७० जणांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले आहे.
पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया यासारख्या साथीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणात फैलाव होतो. बेळगाव जिल्ह्यातही डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून शनिवारी एका २८ वर्षीय तरुणाचा डेंग्यू तापाने मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ३० जूनपर्यंत आरोग्य विभागाने बेळगाव जिल्ह्यातील १५०० हून अधिक लोकांच्या रक्ताचे नमुने तपासले असून यापैकी १७० जणांमध्ये डेंग्यूची लक्षणे दिसून आली आहेत
तर २५० जणांमध्ये चिकुनगुनियाची लक्षणे दिसून आली आहेत. चाचणी केलेल्यांपैकी ७० जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळले असून बेळगाव शहर, खानापूर, रामदुर्ग आणि बैलहोंगलमध्ये सर्वाधिक संख्या दिसून आली आहे.
डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाचे अधिकारी करत आहेत. आपल्या आजूबाजूला पाणी साचणार नाही याची खात्री करावी, साचलेल्या पाण्यात डास अंडी घालतात. फ्लॉवर पॉट्स, बर्ड बाथ आणि तुंबलेली गटर, रेफ्रिजरेटच्या मागील किंवा खालच्या बाजूस असणारा ट्रे, यासारखी पाणी पोचणारी ठिकाणे नियमितपणे तपासून रिकामी करून स्वच्छ ठेवावीत,
पाण्याच्या टाकीवर झाकण ठेवावे यासारख्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. याचप्रमाणे वैयक्तिक सुरक्षेसाठी मच्छर प्रतिबंधक वापरणे, लांब बाही असलेले शर्ट, लांब शर्ट, लांब पँट, मोजे, शूज घालावेत जेणेकरून त्वचेची उघडीप कमी होईल.
डास विशेषत: अडगळीच्या, अडचणीच्या, अंधाऱ्या भागात अंडी घालतात. यामुळे घर प्रकाशमय ठेवण्याचा प्रयत्न करावा. तीव्र ताप, डोकेदुखी, मळमळ, अंगदुखी यासारखी लक्षणे दिसून आल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्यात यावा, असेही सुचविण्यात आले आहे.