बेळगाव लाईव्ह : जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर नेहमीच या ना त्या आंदोलनाने, मोर्चा आणि निवेदनांच्या गराड्यात घेरलेला असतो. कित्येकवेळा जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येक आंदोलनकर्त्याला भेटणे शक्य नसते. त्यामुळे अनेकवेळा जिल्हाधिकाऱ्यांचे शिरस्तेदारच निवेदनाचा स्वीकार करतात. मात्र गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारीपदी नव्याने नियुक्त झालेले जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज स्वतः आंदोलनाकर्त्यांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले. निमित्त होते विणकर समाजाच्या आंदोलनाचे…
सध्या कर्नाटक सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात अनेक प्रस्ताव मांडून मंजूर केले जातात. याच पार्श्वभूमीवर विणकर समाजासाठी प्रस्ताव मांडण्यात यावा, आणि यंत्रमागधारक विणकरांचे वीजबिल माफ करण्याची मागणी करण्यात यावी. या मागणीस्तव जिल्ह्यातील विणकरांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरले.
जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चाच्या माध्यमातून पोहोचलेल्या यंत्रमागधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. विजेच्या दरात वाढ केल्याने विजेवर चालणाऱ्या यंत्रमाग विणकरांचे जगणे असह्य झाले आहे. हेस्कॉमकडून थकीत बिलासाठी आठ ते दहा लाख रुपयांची मागणी केली जात आहे. पण विणकर हे बिल अदा करण्यास असमर्थ आहेत. वस्त्रोद्योगमंत्र्यांनी विणकरांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांना पटवून हा मुद्दा सभागृहात मांडावा. विणकरांचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कर्जबाजारीपणामुळे आतापर्यंत अनेक विणकरांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, वस्त्रोद्योग मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी यासाठी कोणतीच उपाययोजना केली नाही. जोवर विधानसभेत विणकरांच्या वीज बिल माफीवर चर्चा करून प्रस्ताव मंजूर करण्यात येत नाही तोवर बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
एकीकडे वीज बिल माफ करण्याचे आश्वासन तर दुसरीकडे बिल न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला जात आहे. विणकरांचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा पालक मंत्र्यांनी आवाज उठवावा, निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांचा सरकारला विसर पडला असून विणकरांची हि समस्या तातडीने सोडविण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.