बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेकवेळा जनतेला फटका बसला आहे. शहरातील विकासकामांचे ढिसाळ नियोजन, वर्षानुवर्षे रखडलेली विकासकामे या गोष्टींमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील वर्षी पावसाने जरी दडी मारली असली तरी यंदा मात्र पावसाने जोरदार कमबॅक केले! नेहमीप्रमाणेच बेळगावमध्ये विविध ठिकाणी गटारी, नाले तुंबले, रस्त्यावरून पाणी वाहू लागले..
अनेक अडचणी, समस्या डोके वर काढू लागल्या. नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे स्थलांतर काळजी केंद्रामध्ये करण्यात आले. मात्र या साऱ्या नियोजनामागे बेळगाव जिल्हा प्रशासनाने महत्वाची भूमिका बजावली. जिल्हा प्रशासन, सहाय्यक आयुक्त, आपत्ती निवारण विभाग, जल संसाधन विभाग, महसूल विभाग, पोलीस प्रशासन यासह विविध विभागांच्या सहकार्याने जिल्ह्यातील आपत्ती निवारणासाठी पायाला चाके बांधल्याप्रमाणे मंत्री, अधिकारी वर्ग जिल्ह्याचा दौरा करण्यासाठी बाहेर पडले. यादरम्यान अनेक गोष्टींचा आढावा घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले गेले, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगाव LIVE शी बोलताना दिली.
बेळगावला निसर्ग संपदा लाभली आहे. मात्र अतिवृष्टीमुळे निसर्गाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठीही नागरिकांवर निर्बंध आले. हे निर्बंध कायमचेच नसून पावसाचा ओघ कमी झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आली कि हे निर्बंध हटविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
सध्या पावसाळी हंगाम आहे. यादरम्यान काही अतिउत्साही लोक स्वतःसह दुसऱ्याचा जीवही धोक्यात घालतात. मात्र जिल्हा प्रशासन असो किंवा पोलीस प्रशासन किंवा पर्यटन विभाग हे आपल्या सुरक्षेच्या कारणास्तव सूचना देत असते. या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. पावसाळी हंगामात वर्षा पर्यटनाला बहर येतो. मात्र गेल्या आठ दिवसात झालेला पाऊस हा असुरक्षित असल्याचे जाणवल्याने काही ठराविक वेळेसाठी बेळगावमधील विविध पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. पाण्याचा प्रवाह आटोक्यात आला, सुरक्षितता जाणवली तर हे निर्बंध लवकरच हटविण्यात येणार असून तोवर नागरिकांनी सुरक्षेसाठी प्रशासनाने दिलेले नियम पाळावेत असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
अतिवृष्टीमुळे गोकाक, चिक्कोडी, कागवाड मध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून या भागातील लोकांचे काळजी केंद्रात स्थलांतर करण्यात येत आहे. संभाव्य धोका ओळखून प्रशासनाकडून वारंवार देण्यात येणाऱ्या सूचना लक्षात घेऊन नदीकाठच्या आणि सखल भागातील लोकांनी वेळेत स्थलांतर करावे. पावसाचे किंवा नदीचे पाणी घरापर्यंत येण्याची वाट पाहू नये. ऐनवेळी सुविधा पोहोचविणे अवघड होते. काळजी केंद्रामध्ये आवश्यक त्या सर्व सुविधांची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांनी वेळेत निर्णय घ्यावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
२२ जुलैपासून बेळगाव जिल्ह्यासह विविध तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. बेळगावमध्ये विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला होता. आता पावसाचा जोर थोडा ओसरला असून परिस्थितीचा अंदाज घेऊन शाळा पुन्हा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यादरम्यान शालेय व्यवस्थापनाला मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या सर्व सूचना करण्यात आल्या असून अतिवृष्टीमुळे देण्यात आलेल्या सुट्ट्यांमधील चुकलेला अभ्यासक्रम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासंदर्भातही सूचना करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.