बळगाव लाईव्ह :बैलहोंगल जवळील माटोळ्ळी, लिंगदळ्ळी गावानजीकच्या तुडुंब भरलेल्या मलप्रभा नदीच्या काठावर आज रविवारी सकाळी एक भली मोठी मगर आढळून आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नदी काठावर वावरणारी मगर निदर्शनास येताच गावातील एका युवकाने तिचे व्हिडिओ चित्रीकरण करून ते समाज माध्यमांवर व्हायरल केले आहे.
मगरीचा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून नदी काठावर राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून ते नदी जवळ जाण्यास धजावेनासे झाले आहेत.
यासंदर्भात तालुका प्रशासनाने नदी तीरावर राहणाऱ्या नागरिकांनी नदीत उतरू नये अथवा तिच्या जवळ जाऊ नये, असा इशारा दिल्याचे कळते.
दरम्यान नागरिकांनी संभाव्य धोका लक्षात घेऊन संबंधित ठिकाणी मलप्रभा नदी पात्रात असलेली मगर पकडण्यात यावी, अशी मागणी तालुका प्रशासनाकडे केली आहे.