बेळगाव लाईव्ह:महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी बुधवारी सकाळी शहर स्वच्छतेची पाहणी केली. अचानक पाहणीमुळे कर्मचारी आणि अधिकार्यांची चांगलीच धांदल उडाली. बेळगाव शहराच्या स्वच्छतेसाठी महापालिका आयुक्तांनी घेतलेला पुढाकार नंतर सफाई कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली आहे.
बुधवारी पहाटे आयुक्त दुडगुंटी यांनी सदाशिवनगर येथील वाहन विभागाला भेट दिली. त्याठिकाणी वाहनांची स्थिती तपासली. त्यानंतर महांतेशनगर आणि वीरभद्रनगर येथील बीट कार्यालयाला भेट दिली. बेळगाव शहरात सध्या डेंग्यूने थैमान घातले असताना शहर स्वच्छ ठेवण्याची गरज महापालिकेची आहे त्यामुळे महापालिका आयुक्तांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामाकडे लक्ष दिले.
त्याठिकाणी कामगारांच्या हजेरी पुस्तक तपासले. कामगार आणि आरोग्य निरीक्षकांना विविध सूचना केल्या.मागील वर्षी देखील मनपा आयुक्ताने थेट पाहणी केली होती त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांत एक शिस्त लागली होती
अशोकनगर जलतरण तलावाला भेट देऊन स्वच्छता व इतर कामे करण्याची सूचना केली. किल्ला तलाव परिसरात नियमित स्वच्छता करण्यात यावी, असे सांगितले. संबंधित ठेकेदारास अस्वच्छतेबाबत जाब विचारला. खडेबाजार व नरगुंदकर भावे चौक भाजी मंडईला भेट देऊन तेथील साफसफाईच्या कामाचे निरीक्षण केले व खराब झालेला रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
आयुक्तांनी बॉक्साईट रोड येथील जलतरण तलावाची पाहणी केली. याशिवाय, सर्व प्रभागांत मलेरिया औषध फवारणी करण्यात यावे, अशा सूचना आरोग्य निरीक्षकांना केल्या. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे, पर्यावरण अभियंते हणमंत कलादगी आदी उपस्थित होते.