बेळगाव लाईव्ह : महेश ज्ञानेश्वर कामण्णाचे (वय 35, रा. तारीहाळ रोड, विजयनगर, हलगा) या तरुणाचा 13 मे 2022 रोजी खासबागमधील जुना पीबी रोडवरील धाकोजी हॉस्पिटलसमोर किरकोळ कारणावरून वाद झाल्याने चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. युवकाचा खून केल्याप्रकरणी सहा युवकांना जन्मठेपेची शिक्षा चतुर्थ अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मोहन प्रभू यांनी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, महेश हा खासबाग रोडला गॅरेज चालवत होता. तो कार दुरुस्तीचे काम करत होता. 13 मे 2022 रोजी त्याने एक कार दुरुस्त केली व ती ट्रायलला येडियुराप्पा रोडवर नेली. हरियाली हॉटेलच्या पुढे गेल्यानंतर यू टर्न घेताना समोरून या प्रकरणातील मुख्य संशयित नागराज तळवार हा दुचाकीवरून येत होता.एकदम कार का वळवलीस, असे म्हणत दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर महेश कार घेऊन थेट गॅरेजकडे गेला.
मात्र नागराजने त्याचा दुचाकीवरून पाठलाग केला. गॅरेजजवळ दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी महेशचे आई-वडील व अन्य तरुण जमल्याने तेथून नागराज हा निघून गेला. महेश आपल्याशी उद्धट बोलला याचा राग नागराजच्या मनात धुमसत होता. त्यामुळे रात्री तो व त्याचे अन्य पाच मित्र राष्ट्रीय महामार्गावरील हलग्याजवळ सायंकाळी जमले आणि गॅरेजकडे गेले. महेश हा गॅरेजमध्येच होता. त्याच्याशी पुन्हा भांडण उकरून काढत उपरोक्त सहा जणांनी हल्ला चढवत त्याला सायकल चेनने जबर मारहाण केली. त्यानंतर नागराजने चाकूने महेशच्या पोटावर उजवीकडे वार केला. चाकू एक इंच आत घुसल्याने मूत्रपिंडाला इजा होऊन महेश जागीच कोसळला.
या प्रकरणी महेशचे वडील ज्ञानेश्वर लुमाणी कामण्णाचे (वय 67, रा. विजयनगर, हलगा) यांनी शहापूर पोलिसांत फिर्याद दिली होती. शहापूरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर यांनी तपास करत दोन टप्प्यात प्रत्येकी तीन यानुसार सहा संशयितांना अटक केली होती.
गेली दोन वर्षे सुनावणी सुरू होती. साक्षी व पुराव्याच्या आधारे न्यायालयाने नागराज मारुती तळवार (23, रा. रामापूर गल्ली, तारीहाळ), सुरेश मंजुनाथ हुलमणी (22, रा. खासबाग), भरमा परशुराम कांबळे (28, रा. आंबेडकर गल्ली, शहापूर), आकाश दिलीप गाडीवड्डर (23, रा. शांती गल्ली, पहिला क्रॉस, खासबाग), प्रवीण हणमंत महार (24, रा. आंबेडकर गल्ली, शगनमट्टी, ता. बेळगाव) व सुभाष सुंकाप्पा कल्लवड्डर (23, रा. लक्ष्मी गल्ली, कोळीकोप्प, ता. बेळगाव) या सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
प्रत्येक आरोपीला 20 हजाराचा दंड ठोठावला असून तो न भरल्यास सहा महिन्याची साध्या कैदेची शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून अॅड. दीपक ओसवाल यांनी काम पाहिले.
हलग्याच्या मेकॅनिक युवकाचा भोसकून खून