बेळगाव लाईव्ह : गेल्या आठवड्यात महापालिकेने महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये कारवाई करत आठ गाळयांना टाळे ठोकले होते.
पण ही कारवाई करून महापालिकेचे पथक तेथून काढता पाय घेताच त्याठिकाणी टाळे तोडून काहींनी आपले टाळे लावले होते. महात्मा फुले भाजी मार्केटमधील ८ गाळ्यांचा पुन्हा महापालिकेने ताबा घेतला असून हे गाळे भाडेकरूंना देण्यात आले आहेत.
या भाजी मार्केटचा वाद न्यायालयात असतानाही काहींनी या गाळ्यांवर दावा केला आहे. त्यांनी तसा फलकही लावला आहे. पण महापालिकेने ताब्यात घेतलेल्या गाळयांना पुन्हा आपले टाळे लावल्याने हे प्रकरण गांभीर्याने घेतले होते.
तर काही दिवसांपूर्वी या ठिकाणी असलेल्या इतर भाडेकरूंनीही महापालिकेकडे काही जण आपल्यावर जबरदस्ती करून भाडे भरण्यास सांगत असल्याची तक्रार केली होती.
शुक्रवारी दुपारी महापालिकेचे पथक महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये दाखल होऊन त्या ठिकाणी लावलेले टाळे तोडण्यात आले . ज्या भाडेकरूंना सदर गाळे देण्यात आले आहेत त्यांनाहे गाळे परत करण्यात आले. यावेळी महसूल अधिकारी संतोष आनीशेट्टर, नंदकुमार बांदीवडेकर आदी उपस्थित होते.


