बेळगाव लाईव्ह :मोठ्या प्रमाणातील वाहतुकीसह जांबोटी व चोर्ला परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव शहरातून जांबोटी, चोर्ला मार्गे गोव्याकडे जाणाऱ्या रस्त्याची वाताहत झाली आहे.
याच बरोबर या रस्त्यावरील पुल देखील धोकादायक बनल्यामुळे चोर्ला मार्गे गोव्याकडे जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांनी पिरनवाडी क्रॉस जवळ डावीकडे वळण घेऊन खानापूर मार्गे गोव्याकडे जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अनमोड घाटातून गोव्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे बेळगाव चोर्ला मार्गावरूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होती. त्यामुळे हा संपूर्ण रस्ता खराब होऊन त्याची चाळण झाली आहे.
याचबरोबर चोर्ला मार्गावरील मलप्रभा नदीवर असलेला ब्रिटिशकालीन पूल धोकादायक बनला असून त्या ठिकाणी दुर्घटना घडू शकते. त्यासाठी या रस्त्यावरील वाहतूक बंद करावी अशी मागणी कणकुंबीवासीयांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून वाहनांनी आता पिरनवाडी क्रॉस जवळ डावीकडे वळण घेऊन खानापूर मार्गे गोव्याकडे जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.