बेळगाव लाईव्ह : म्हादई जलवाटप तंटा लवादाच्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या म्हादई प्रवाह प्राधिकरणाच्या सदस्यांनी आज कणकुंबी येथे कोसळणाऱ्या मुसळधार पावसातच म्हादई आणि मलप्रभा नदीच्या पाणलोट क्षेत्रांना, तसेच कळसा-भांडुरा प्रकल्पाला भेट दिली.
मात्र, गोव्याचा आक्षेप असलेला पारवाड नाला दाखवण्यास कर्नाटकच्या सदस्यांनी टाळाटाळ केली, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
प्रवाह प्राधिकरणाच्या पथक प्रमुख पी. एम. स्कॉट यांच्या नेतृत्वाखालील या पथकासह गोव्याचे पाटबंधारे विभागाचे वीरेंद्र शर्मा, मनोज तिवारी, नीरज मांगलिक, मिलिंद नायक, सुभाष चंद्र, प्रमोद बदामी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कर्नाटक पाटबंधारे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश अम्मीनभावी यांनी गोव्याहून आलेल्या या पथकाचे कणकुंबी जंगलातील कळसा नाल्याजवळ स्वागत केले. यावेळी कर्नाटक जलसंपदा, महसूल आणि वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी गोव्याचे प्रतिनिधी सुभाष चंद्र यांनी पारवाड नाला पूर्वी गोव्याकडे यायचा, आता तो उलट्या दिशेने मलप्रभेत वळवला आहे असा मुद्दा मांडला, परंतु केवळ कळसा नाल्याची बंद केलेली तोंडे ‘प्रवाह’ला दाखवण्यात आली.
समितीने हलतारा नाल्याच्या पाहणीनंतर सुर्ला येथील प्रस्तावित ५ बंधाऱ्यांच्या ठिकाणी पाहणी केली. प्रत्यक्षात हे बंधारे कर्नाटकातील राखीव वन क्षेत्र व म्हादई अभयारण्य खोऱ्यात येते. तेथे प्रकल्पासाठी केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी आवश्यक आहे.
या पथकाने कर्नाटक-गोवा सीमेवरील कणकुंबी आणि लगतच्या जंगलांना भेट दिली. म्हादई आणि मलप्रभा नद्यांचा संगम असलेल्या अलात्री खड्डा, सुरल खड्डा, बैल खड्डा, कोटणी खड्डा, भांडुरी खड्डा आणि कळसा खड्डा येथे पाहणी केली आणि कणकुंबीची सद्यस्थिती तपासली.
यानंतर कणकुंबी येथे बैठक घेऊन कर्नाटक पाटबंधारे महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून म्हादई व मलप्रभा पाणलोट प्रकल्पाची सविस्तर माहितीही घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी पथकाला सर्वसमावेशक माहिती दिली आणि कागदपत्रेही सादर केली. याबाबत आज बेंगळुरू येथे बैठकही होणार आहे.