बेळगाव लाईव्ह :सततच्या पावसामुळे सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथील गटारीचे सीडी बांधकाम अचानक कोसळून रस्त्यावर भगदाड पडल्याची घटना सायंकाळी घडली.
सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथील गटारीचे सीडी बांधकाम 20 वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार रमेश कुडची यांच्या पुढाकाराने झाले आहे. काल सायंकाळी सततचा पाऊस आणि गटारीतील पाण्याचा वाढलेला प्रवाह यामुळे सदर सीडीचे एका बाजूचे बांधकाम खचून कोसळले.
परिणामी रस्त्यावर भगदाड निर्माण झाले आहे. या सीडी बांधकामाला लागूनच नाला आहे. त्याचप्रमाणे सीडी खाली गॅस पाईपलाईन आहे. रस्त्यावर पडलेल्या भगदाडामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
मात्र सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन त्या भगदाडाच्या ठिकाणी झाडाच्या फांद्या टाकण्याबरोबरच सदर घटनेची माहिती काल रात्री महापालिका आयुक्त आमदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिली.
तेंव्हा मनपा आयुक्तांनी पाहणी करून तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल, असे आश्वासन दिले आहे.