बेळगाव लाईव्ह : कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगाव महानगर पालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी (दि. 6 जुलै) सकाळी 11 वाजता कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कोणते भाग हस्तांतरित केले जातील हे ठरवण्यावर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात येणार आहे.
संबंधित अहवाल संरक्षण मंत्रालयाला सादर करण्यासाठी ही तातडीची आणि महत्वाची बैठक बोलाविण्यात आली आहे.
या बैठकीत कॅन्टोन्मेंट बोर्ड फोर्ट झोन क्षेत्राबाहेरील बी 2 जमिनी महानगरपालिकेकडे हस्तांतरित करणे, एफएसआय निर्बंधांबाबतच्या बाबींसह ब्रिगेडियर चर्चा करतील. यासंदर्भातील समितीच्या अध्यक्षांनी सीईओंना सुधारित सादरीकरण तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बदलीची कारवाई सुरू आहे. मात्र, कॅन्टोन्मेंट बोर्डाने महापालिकेला आवश्यक माहिती देण्यास दिरंगाई केल्यामुळे अलीकडच्या काही महिन्यांत ही प्रक्रिया मंदावली. यानंतर फेब्रुवारीमध्ये एक समिती स्थापन करण्यात आली. याचदरम्यान 22 फेब्रुवारीला एक बैठक झाली. या बैठकीत राज्य आणि केंद्राचे अधिकारी उपस्थित होते.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डासह देशातील काही कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेला वेग आला असून डिसेंबरअखेर हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कोणते भाग हस्तांतरित केले जातील हे ठरवण्यासाठी लष्करी आणि नागरी क्षेत्रांच्या विभाजनावर देखील चर्चा करण्यात येणार आहे.
या बैठकीस ब्रिगेडियर बोर्डाचे अध्यक्ष जयदीप मुखर्जी, सीईओ राजीव कुमार, खासदार इराण्णा कडाडी आमदार राजू सेठ बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सुधीर तुपेकर आदी उपस्थित राहणार आहेत.