बेळगाव लाईव्ह :मंत्र-तंत्र, जादूटोणा एखाद्याचे बरे वाईट होऊ शकते ही पूर्वापार मानसिकता आजही आपल्या समाजात कायम आहे. आजच्या आधुनिक युगात याला अंधश्रद्धा म्हंटले जात असले तरी त्यात तथ्यांश तर नाही ना? अशी शंका कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका तक्रारीवरून व्यक्त होत आहे.
कारण खुद्द दिवंगत खासदार एस. बी .सिदनाळ यांची स्नुषा व प्रसिद्ध उद्योजक विजय संकेश्वर यांच्या कन्या दीपा शिवकांत सिदनाळ यांनी आपला दीर, जाऊ आणि त्यांच्या मुलगा हे तिघेजण माझ्या कुटुंबाच्या वाईटासाठी मंत्र-तंत्र, काळी जादू करत आहेत, अशी तक्रार पोलिसात नोंदविली आहे.
आपले दिर, जाऊ व त्यांचा मुलगा या त्रिकूटाने काळी जादू -तंत्रमंत्राद्वारे माझ्या पतीचा बळी तर घेतलाच आहे, आता त्याच माध्यमातून माझाही बळी घेण्याचा आणि आमच्या विजयाकांत दूध डेअरीसह आमची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न चालविला आहे, अशी फिर्याद दिपा यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात दिली आहे.
दिवंगत उद्योजक शिवकांत सिदनाळ यांच्या पत्नी असलेल्या दीपा सिदनाळ यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे दीर शशिकांत एस. सिदनाळ, त्यांची पत्नी वाणी व मुलगा दिग्विजय शशिकांत सिदनाळ या तिघांसह एका अनोळखी व्यक्तीविरोधात गेल्या 29 जून रोजी भादंवि कलम 120 बी, 506, 37 तसेच काळी जादू प्रतिबंधक कायदा 2017 नुसार गुन्हा नोंद झाला आहे. चॅपेल रोड, कॅम्प येथे राहणाऱ्या दीपा सिदनाळ आपल्या फिर्यादीमध्ये म्हंटले आहे की, माझे पती स्व. शिवकांत सिदनाळ व वडील विजय संकेश्वर यांच्या नावे असलेली विजयकांत डेअरी ही संस्था ताब्यात घेण्याचा तसेच माझ्या जीवाला अपाय होईल, असे कृत्य माझे दिर, जाऊ व त्यांचा मुलगा करत आहेत.
त्यासाठी सातत्याने उतारा टाकणे, मंत्रतंत्र करणे असे काळ्या जादूचे प्रकार केले जात आहेत. गेल्या 15 नोव्हेंबर 2019 पासून 6 जून 2024 पर्यंत असे प्रकार घडलेले आहेत. अनेकदा आमच्या घराच्या बाजूला अनोळखी व्यक्ती येते मंत्रवलेल्या वस्तू ठेवून निघून जाते. त्यामुळे ती अनोळखी व्यक्तीदेखील या प्रकारात सामील असल्याचा आरोप दीपा यांनी फिर्यादीत केला आहे.
उद्योजक शिवकांत सिदनाळ यांचे 6 एप्रिल 2024 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाला उपरोक्त तिघांनी केलेले मंत्रतंत्र व काळी जादूच कारणीभूत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. शिवकांत यांच्या मृत्यूनंतर समाधीजवळदेखील मंत्रतंत्र करुन उतारे ठेवल्याचा आरोपही केला आहे. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला असून निरीक्षक अल्ताफ मुल्ला तपास करीत आहेत.
कौटुंबिक पार्श्वभूमी : बेळगावचे खासदार स्व. एस. बी. सिदनाळ यांना शशिकांत व शिवकांत अशी दोन मुले. धाकटा मुलगा शिवकांत यांचा विवाह 2002 मध्ये उद्योजक विजय संकेश्वर यांची द्वितीय कन्या दीपा यांच्याशी झाला. विवाहानंतर दोघा भावांमध्ये वितुष्ट येऊन शिवकांत बाहेर पडले.
त्यांनी बैलहोंगल तालुक्यातील नेगीनहाळ येथे 2006 मध्ये विजयकांत नावाने दूध डेअरी सुरू केली. कालांतराने या डेअरीचा पसारा इतका वाढला की दररोज 1 लाख 20 हजार लिटर दूध संकलन होऊ लागले. त्यानंतर त्यांनी आदित्य नावाचा ब्रँड विकसित करत दुग्धजन्य उपपदार्थाची विक्री सुरू केली. हा ब्रँड मोठा ब्रँड ही झपाट्याने मोठा बनला. सध्या या डेअरची चेअरमन विजय संकेश्वर आहेत. आमच्या याच डेअरीवर जाऊ व दिराचा डोळा असून ती हिसकावून घेण्यासाठी काळी जादू व मंत्रतंत्राचा वापर सुरू असल्याचा आरोप करत दीपा यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.