बेळगाव लाईव्ह : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावरील आचारसंहिता भंग गुन्हा आणि महाराष्ट्र राज्य फलक हटवल्या नंतर येळळूर मधील मराठी भाषिकांना झालेली मारहाण या दोन्ही याचिकांच्या सुनावण्या गुरुवारी बेळगाव कोर्टात झाल्या.
विधानसभा निवडणुकीच्या काळात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यासह आठ जणांवर दाखल आचारसंहिता भंगाच्या गुन्ह्याची सुनावणी लांबणीवर पडली.
महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक काढल्यानंतर ग्रामस्थांवर पोलिसांनी अमानुष हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांवरच गुन्हे दाखल केले. याप्रकरणी आज झालेल्या विविध गुन्ह्यांच्या सुनावणीत सात जणांची साक्ष नोंदवण्यात आली.
2018 साली येळ्ळूर येथील कुस्ती मैदानात संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करत त्यांच्यासह मारुती कुगजी, प्रदीप देसाई, विलास नंदी, दत्तात्रय पाटील, मधु पाटील, भोला पाखरे किरण गिवडे आदींवर यांच्यावर वडगाव पोलिसांत गुन्हा नोंद आहे. या प्रकरणाची आज सुनावणी होती. पण, साक्षीदार उपस्थित राहिले नसल्यामुळे सुनावणी लांबणीवर पडली. पुढील सुनावणी 3 ऑगस्ट रोजी होणार आहेत.
2014 मध्ये येळ्ळूर वेशीतील महाराष्ट्र राज्य फलक हटवण्यात आल्यानंतर त्याला ग्रामस्थांनी शांततेत विरोध केला. पण, पोलिसांनी ग्रामस्थांना बेदम मारहाण केली. त्यानंतर लोकांवरच गुन्हे दाखल केले.
याप्रकरणी गुरुवारी सुनावणी होती. या सुनावणीत तपास अधिकारी एस. आर. गडाद यांच्यासह सात जणांच्या साक्षी झाल्या. पुढील सुनावणी 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. ग्रामस्थांच्या वतीने अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. शाम पाटील, अॅड. हेमराज बेंचन्नावर हे काम पाहात आहेत. यावेळी अॅड. मारुती कामानाचे देखील उपस्थित होते.