बेळगाव लाईव्ह : गेल्या तीन ते चार दिवसात बेळगाव जिल्ह्यासह सर्वत्र धुव्वाधार पावसाने हजेरी लावली असून निरंतर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाला असून पावसाची संततधार मात्र सुरूच आहे. गेल्या आठ दिवसात बेळगाव जिल्ह्यात तालुकानिहाय पडलेल्या पावसाची नोंद खालीलप्रमाणे आहे.
बेळगाव जिल्ह्यात अथणी तालुक्यात ६५ मिमी, बैलहोंगलमध्ये १२९ मिमी, बेळगावमध्ये ४५५ मिमी, चिक्कोडीमध्ये १३४ मिमी, गोकाक ६८ मिमी, हुक्केरी १५० मिमी, कागवाड ६८.५ मिमी, खानापूर ७५६ मिमी, कित्तूर २७० मिमी, मूडलगी ६७ मिमी, निपाणी २०१.८ मिमी, रायबाग ७४ मिमी, रामदुर्ग ६४ मिमी आणि सौंदत्तीमध्ये ७६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या आठ दिवसातील पावसाची सरासरी पाहता जून महिन्यात संपूर्ण महिनाभर जितकी पावसाची नोंद झाली आहे तितकी नोंद केवळ जुलै महिन्यात ८ दिवसात नोंदविली गेली आहे.
काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. संभाव्य पूरपरिस्थिती, अतिवृष्टी परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली असून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
आंबोली कडे जाणारा रस्ता दाटे येथे रस्त्यावर पाणी आल्याने सोमवारी बंद झाला होता त्याच बरोबर जंगल भागातील अनेक रस्ते पावसाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत पायवाटा असणारी दुर्गम गावाकडे जाताना नागरिकांचे हाल होत आहेत. बेळगाव शहरात काही ठिकाणी गटारीवर अतिक्रमण झाल्याने आणि काही ठिकाणी गटारी स्वच्छ न केली गेल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण होत आहे काही शिवरातून पाणी वाढलेले आहे त्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढला तर शहर व ग्रामीण भागात जनजीवन अस्तव्यस्त होऊ शकते.
सोमवारी पावसा बरोबर थंडीची लाटही पसरलेली आहे बऱ्याच नागरिकांनी घरातून बाहेर पडण्याचे टाळले आहे त्याच बरोबर पावसाळी आजार पणामुळे रुग्णालयातील गर्दी वाढू लागली आहे. या काळात लोकांनी पाणी उकळून प्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामीण भागासह शहरात जोराचा वारा सुटल्याने झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाण देखील वाढले असून अनेक कच्चा घरांच्या भिंती देखील कोसळल्या आहेत. एकंदर उशिरा चालू झालेला पाऊस सरासरी पर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर आहे.