बेळगाव लाईव्ह : भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीणच्या वतीने मुतगा येथे विशेष जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली.
या बैठकीत बोलताना खासदार जगदीश शेट्टर म्हणाले की, बेळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण परिश्रम घेणार आहोत, याआधीही अनेक विकास प्रकल्पांबाबत केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या असून, आपण बेळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असून जिल्ह्यात नवीन प्रकल्प आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे खास. शेट्टर म्हणाले.
या बैठकीत सहभागी झालेले खासदार विश्वनाथ हेगडे कागेरी म्हणाले की, राज्यात काँग्रेसचे सरकार असूनही एनडीए आघाडीने कर्नाटकातील 19 लोकसभा मतदारसंघ जिंकले आहेत. राज्यातील काँग्रेस सरकारच्या गलथान कारभाराला जनतेने योग्य धडा शिकवला आहे, असे ते म्हणाले.
राज्यातील काँग्रेस सरकारच्या सत्तेला जनता कंटाळली असून लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या उमेदवारांनी जास्त जागा जिंकल्या आहेत. राज्यात भ्रष्टाचाराने परिसीमा ओलांडली आहे, बेकायदेशीर कामे वाढत आहेत, मुडा, वाल्मिकी महामंडळासारख्या घोटाळ्यांना जबाबदार असलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी केळी.
प्रदेश उपाध्यक्ष मुरुगेश निरानी म्हणाले की, बेळगाव लोकसभा निवडणुकीत जगदीश शेट्टर यांचा विजय कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच झाला आहे, सत्तेच्या आणि पैशाच्या लालसेपोटी राज्यात गोंधळ निर्माण केलेल्या काँग्रेसला जिल्ह्य़ातील जनतेने त्यांना योग्य धडा शिकवला आहे, असे ते म्हणाले.
यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके, खासदार इराण्णा काडाडी, माजी खासदार मंगला अंगडी, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, माजी आमदार संजय पाटील, जगदीश मेटगुड्ड, महांतेश दोड्डगौडर, विश्वनाथ पाटील, अरविंद पाटील, माजी आमदार डॉ. संदीप देशपांडे, धनश्री देसाई, के.व्ही.पाटील, एफ.एस.सिद्धनगौडा, नितीन चौगले, इराण्णा अंगडी, यल्लेश कोलकर, महेश मोहिते, आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.