बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील सेंटपॉल हायस्कूलचा विद्यार्थी अमन अभिजित सुणगार याने बसवनगुडी जलतरण तलाव येथे नुकत्याच झालेल्या कर्नाटक राज्य उपकनिष्ठ आणि कनिष्ठ जलतरण स्पर्धेत घवघवीत यश संपादन करण्याद्वारे राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक राज्याच्या संघात स्थान मिळवले आहे.
कर्नाटक राज्य उपकनिष्ठ आणि कनिष्ठ जलतरण स्पर्धेच्या पहिल्या गटात अमन सुणगार याने 50 मी., 100 मी. आणि 200 मी. बॅकस्ट्रोक शर्यतीमध्ये तसेच 4×100 मेडले रिलेमध्ये अशी एकूण चार सुवर्ण पदके हस्तगत केली आहेत.
याखेरीज त्याने 4×200 फ्रीस्टाइल रिलेमध्ये कांस्य पदकही मिळवले. सदर कामगिरीमुळे आता त्याची भुवनेश्वर, ओडिशा येथे येत्या 6 ते 11 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे.
बेंगळुरू येथील डॉल्फिन ॲक्वेटिक आणि बेळगावमधील स्विमर्स क्लब येथे जलतरणाचा सराव व प्रशिक्षण घेणाऱ्या अमन सूणगार याला जलतरण प्रशिक्षक मधुकुमार बी.एम., अक्षय शेरेगार आणि उमेश कलघटगी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
त्याचप्रमाणे आई-वडिलांसह सेंटपॉल हायस्कूलचे प्राचार्य फादर सायमन फर्नांडिस, उपप्राचार्य अलेंड्रो दा कोस्टा आणि क्रीडा शिक्षक अँथनी डिसोझा यांचे प्रोत्साहन लाभत आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतील सुयश आणि राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल अमन अभिजित सुणगार याचे शाळेसह सर्वत्र अभिनंदन होत आहे.