बेळगाव लाईव्ह :हिंडलगा येथील श्री कलमेश्वर मंदिरासमोरील खुल्या जागेत अतिक्रमण करून उभारण्यात आलेला फलक आज बुधवारी ग्रामपंचायतीच्या आदेशावरून धडक कारवाई करत हटविण्यात आला. संतप्त गावकऱ्यांनी मोर्चा काढून ग्रामपंचायतीला घेराव घालताच सदर कारवाई करण्यात आली.
बेळगाव तालुक्यातील हिंडलगा येथील श्री कलमेश्वर मंदिरा समोरील खुल्या जागेत गावातील एकाने अतिक्रमण करून मालकी हक्क सांगणारा आपल्या नावाचा फलक उभारला होता. त्यामुळे मंदिराकडे ये-जा करण्याच्या रस्त्यावर अडथळा निर्माण झाला होता. बेकायदेशीर रित्या उभारण्यात आलेला हा फलक तात्काळ हटवण्यात यावा, अशी मागणी देवस्की पंच कमिटी, मंदिर जीर्णोद्धार कमिटी आणि गावकऱ्यांनी सातत्याने ग्रामपंचायतीकडे केली होती.
मात्र त्याकडे दुर्लक्ष करत ग्रामपंचायतीने कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आज बुधवारी सकाळी मंदिर बंद ठेवण्याबरोबरच मोर्चा काढून ग्रामपंचायतीला घेराव घातला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच ग्रामपंचायत अध्यक्ष आणि पीडीओनी तातडीने ग्रामसभा बोलावली.
ग्रामपंचायतच्या या सभेत गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यावेळी कांही ग्रा. पं. सदस्य आणि गावकऱ्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी देखील उडाली. अखेर संबंधित अतिक्रमण आणि उभारण्यात आलेला फलक तात्काळ हटवून जागा ताब्यात घेण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. त्यानुसार आदेश जारी होताच ग्रा. पं. सदस्य आणि गावकऱ्यांनी संबंधित नामफलक उखडून ती खुली जागा ग्रामपंचायतच्या ताब्यात दिली. या पद्धतीने बेकायदा नामफलक व अतिक्रमण हटवून मंदिराचा रस्ता खुला होताच मंदिरात सामूहिक आरती करण्यात आली.
घटनास्थळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना हिंडलगा देवस्थान सुधारणा समितीचे सदस्य गजानन काकतकर यांच्यासह गावकऱ्यांनी सांगितले की, श्री कलमेश्वर समोरच्या खुल्या जागेतील अतिक्रमणासंदर्भात आम्ही गावात ठिकठिकाणी बैठका घेऊन अतिक्रमण हटवण्यासंदर्भात सर्वानुमते ग्रामपंचायतीला निवेदन देण्याचा निर्णय घेऊन आज निवेदन सादर केले. या अतिक्रमणासंदर्भात ग्रामपंचायतीच्या यापूर्वी दोन बैठका झाल्या. मात्र त्यामध्ये काहीही निष्पन्न झाले नाही. तथापि आजच्या बैठकीत सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गावकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेतली. सदर मंदिर हे संपूर्ण गावाचे असल्यामुळे बैठकीत संबंधित खुली जागा गावाच्या मालकीची असली पाहिजे असा ठोस निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक मालमत्ता जी असते ती सुरक्षित ठेवणे ही ग्रामपंचायत आणि संपूर्ण गावाची जबाबदारी आहे.
त्यानुसार आज गावकऱ्यांनी आवाज उठवत ग्रामपंचायत मार्फत श्री कलमेश्वर मंदिरासमोरील अतिक्रमण हटविले आहे. हा एक प्रकारे गावकऱ्यांचा विजय आहे. या कारवाई संदर्भात कांही न्यायालयीन वाद निर्माण झाला तरी आम्ही त्याला समर्थपणे तोंड देत ही जमीन वाचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज ज्या पद्धतीने अतिक्रमण हटवण्यात आले त्या पद्धतीने गावातील अन्य ठिकाणी झालेली अतिक्रमण देखील हटविण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे, अशी माहिती गजानन काकतकर यांनी दिली.