बेळगाव लाईव्ह :रयत गल्ली वडगाव येथील नळांना गेल्या अनेक दिवसापासून दूषित पाणी येत असल्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी येथील नागरिकांना भटकंती करावी लागत असून महापौरांसह महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.
रयत गल्ली वडगाव येथील नळाला येणाऱ्या पिण्याच्या पाण्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेजचे सांडपाणी मिसळत आहे. परिणामी येथील जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण तर झाला आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील धिम्या गतिने गळती काढण्याचे काम केले जात असल्यामुळे नागरिकात संताप व्यक्त होत आहे.
यापूर्वी ज्या मुख्य जलवाहिनीतून अर्थात पाईपमधून गल्लीतील जून्या विहिरीचे पाणी रोज येत होते त्याचेही पाईप काढून टाकण्यात आले आहेत. रयत गल्लीतील बहुतांश घरांमध्ये मोठ्या प्रमाणात बैल, गाय, म्हैस वगैरे जनावरे आहेत. नळाला येणाऱ्या दूषित पाण्यामुळे सध्या या गल्लीतील रहिवाशी आणि जनावरांचे पिण्याच्या पाण्याअभावी हाल होत आहेत.
जनावरांसाठी व घरगूती वापराला पाणी नसल्याने बैलगाडीतून इतर ठिकाणचे पाणी आणण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. त्याचबरोबर गल्लीत जी कुपनलिका आहे त्याला सुध्दा गटारीचे दुषीत पाणी येत असल्याने कुठलेच पाणी नाही अशी परिस्थिती रयत गल्ली येथे उद्भवली आहे.
तेव्हा महापौरांसह महापालिकेच्या संबंधित अधिकारी तसेच पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रयत गल्ली वडगाव येथील रहिवाशांची पिण्याच्या पाण्याची समस्या तात्काळ दूर करावी अशी जोरदार मागणी केली जात आहे.