बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागात येणाऱ्या उचगाव या गावातील जागृत देवस्थान अशी ख्याती असणारे श्री मळेकरणी देवस्थान! या देवस्थानात हजारो भाविक दर्शनासाठी येतात. जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या या देवस्थानात अनेक नवस बोलले जातात. ते नवस फेडण्यासाठी पशुमानाचा बळी दिला जातो. परंतु याच पशुमानामुळे सध्या ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि देवस्थानाचे हक्कदार देसाई बंधू यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.
शुक्रवारी काकती पोलीस निरीक्षक तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांनी उचगावला भेट दिली अन् यात्रेबाबत मार्गदर्शन केले सूचना केल्या मंदिर परिसरात पशू बळी देऊ नये अश्या सूचना केल्या.
ग्रामपंचायत अध्यक्षा मथुरा तेरसे, ग्रामपंचायत सदस्य आणि उचगाव ग्रामस्थांच्या सहमतीने देवस्थान परिसरात यात्रा करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घालण्यात आला. यात्रा करण्यासाठी येणाऱ्या भाविकांकडून दिल्या जाणाऱ्या पशुमानाच्या बळीनंतर रक्त, मांस इतरत्र फेकून दिल्यामुळे संपूर्ण गावात दुर्गंधी पसरली आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांकडून गावातील शेतशिवारात कचरा करण्यात येत आहे. मांसाहारासोबत दारूच्या पार्ट्या केल्या जात आहेत. इतकेच नव्हे तर दारूच्या बाटल्या शेतात फोडून शेतजमिनीची नासधूस करण्यात येत आहे.
यात्रेला येणाऱ्या भाविकांची श्रद्धा कमी आणि मटण आणि दारूसाठी होणारी गर्दी अधिक! दर मंगळवारी आणि शुक्रवारी गावात होणारी प्रचंड वाहतूक कोंडी, वाहतूक कोंडीमुळे घडणारे असंख्य अपघात, ग्रामस्थांची होणारी गैरसोय, मद्यपींकडून महिला आणि तरुणींची काढली जाणारी छेड, यात्रेसंदर्भात असणारी अव्यवस्था आणि यातून गावभर इतस्थतः पसरणारे पशुमानाच्या बळीचे रक्त आणि मांस यामुळे ग्रामस्थांना अनारोग्याला सामोरे जावे लागणे, आसपास परिसरात असणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना होणारा नाहक त्रास, विभागनिहाय शासकीय कार्यालयेही याच परिसरात असल्याने इतर नागरिकांना होणारा मनस्ताप या सर्व गोष्टींची कारणमीमांसा तपासत ग्रामस्थांनी, ग्रामपंचातीने जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्याकडे सदर यात्रेमुळे होणाऱ्या त्रासांबद्दल माहिती सांगितली. यानुसार सर्वांच्या संगनमताने मळेकरणी देवस्थान परिसरात पशुमान बळी देण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र या निर्णयामुळे भाविकांची मने दुखावली गेली. देवस्थानाचे हक्कदार देसाई बंधूंनी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांवर आरोप केले. पुरातन काळापासून ख्याती असलेल्या देवस्थानासंदर्भात असा निर्णय घेणे योग्य नसल्याचे सांगत देसाई बंधूंनी नाराजी व्यक्त केली. शिवाय यामागे राजकीय दबावतंत्र वापरल्याचा आरोप केला. या देवस्थानाच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलात भागीदारी हवी असल्यामुळे हे षडयंत्र रचण्यात आल्याचा गंभीर आरोप देसाई बंधूंनी केला आहे. याप्रकरणी कायदेशीररित्या मार्ग काढण्याची तयारीदेखील देसाई बंधूंनी दाखविली आहे. दरम्यान बाहेरून येणाऱ्या भाविकांनीही देसाई बंधूंना साथ दिली आहे.
याठिकाणी पशुमान करण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी केली. एकीकडे ग्रामस्थांची होणारी कुचंबणा तर मळेकरणी देवस्थानात होणाऱ्या यात्रांसाठी गावामध्ये सुरु करण्यात आलेली कार्यालये, यात्राकाळात देवस्थान परिसरात लहान विक्रेत्यांची होणारी रोजगाराची सोय या सर्व गोष्टी अडचणीत येणार असल्याने या यात्रेसंदर्भात विचारविनिमय करून पुन्हा एकदा निर्णय घेण्याचा विचार सुरु आहे.
देवस्थान परिसर वगळता कार्यालयात यात्रा करण्यासाठी मुभा देण्यात आली तर पुन्हा पार्किंगचा प्रश्न निर्माण होईल यासाठी गावच्या हद्दीत यात्राच करू नये, देवीची ओटी, पूजाअर्चा करून पशुमानाचा विधी आपल्या सोयीनुसार आपल्या घरी अथवा अन्यत्र करण्यात यावा असा सल्ला ग्रामपंचातीच्यावतीने देण्यात आला आहे.
शुक्रवारी या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला असून या निर्णयाच्या विरोधात जाऊन आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
दुसरीकडे यात्रेसंदर्भात आपणही कायद्यानुसार मार्ग काढू अशी तयारी देवस्थान हक्कदार देसाई बंधूंनी दर्शविली आहे. हे देवस्थान देसाई कुटुंबाशी निगडित असल्याने यामध्ये कुणालाही भागीदारी देण्याचा प्रश्न उद्भवत नाही असा पवित्रा घेतल्याने हे प्रकरण आता वेगळे वळण घेत असल्याचे दिसून येत आहे.