Thursday, December 26, 2024

/

मोटरसायकलची टेम्पोला धडक; बेळगावचे 2 युवक ठार

 belgaum

बेळगाव लाईव्ह :नियंत्रण सुटलेल्या भरधाव मोटरसायकलने समोरून येणाऱ्या टेम्पोला धडक दिल्यामुळे घडलेल्या भीषण अपघातात बेळगावचे दोन युवक ठार झाले. बेळगाव -वेंगुर्ला रस्त्यावर हिंडगाव फाटा ते गवसे फाटा दरम्यानच्या वळणावर काल मंगळवारी दुपारी हा अपघात घडला.

मलिक खतालसाब मुजावर (वय 22, रा. मोदगा, ता. बेळगाव) आणि दौलत खतालसाब मोमीन (वय 22, रा पंतबाळेकुंद्री, ता. बेळगाव) अशी अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी युवकांची नावे आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की कोनुर बुद्रुक येथून सिमेंटची पोती उतरवून एक मालवाहू टेम्पो गडिंग्लजच्या दिशेने जात होता.

त्यावेळी मलिक मुजावर व दौलत मोमीन हे दोघे मित्र मोटरसायकल वरून आंबोलीकडे निघाले होते. गवसे -हिंडगाव फाट्या दरम्यानच्या वळणावर मलिक याचा अचानक मोटरसायकल वरील ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या टेम्पोला त्यांची जबरदस्त धडक बसली.

अपघातात मलिक जागीच ठार झाला तर गंभीर जखमी झालेल्या दौलत याचे उपचाराचा फायदा न होता बेळगाव येथील रुग्णालयात निधन झाले. चंदगड पोलीस ठाण्यामध्ये अपघाताची नोंद झाली आहे.

मयत मलिक मुजावर हा कार मेकॅनिक, तर दौलत मोमीन हा रिक्षा चालक होता. सोमवारी बकरी ईद उत्साहात साजरी करून हे दोघेही अन्य मित्रांसोबत दुचाकीवरून अंबोली पर्यटनासाठी निघाले होते.

मात्र अंबोलीला पोहोचण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या आकस्मिक अपघाती मृत्यूमुळे मोदगा व पंतबाळेकुंद्री येथील गावकऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.