Monday, December 23, 2024

/

उत्कंठा शिगेला….! मतदारांचा कौल कुणाच्या पारड्यात?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : ७ मे रोजी कर्नाटकात दुसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत राजकीय अनुभव असलेले, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि राजकीय पार्श्वभूमी असलेले परंतु नवोदित उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्यात कडवी लढत झाली आहे. चिकोडी लोकसभा मतदारसंघात भाजपचा अण्णासाहेब जोल्ले यांना काँग्रेसच्या युवा नेत्या प्रियांका जारकिहोळी  यांनी कडवी टक्कर दिली आहे.

या निवडणुकीची मतमोजणी उद्या, मंगळवारी ४ जून रोजी होणार असून आता प्रत्येकाची नजर निवडणुकीच्या निकालाकडे खिळली आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी बेळगाव तर चिकोडी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी चिकोडी येथे होणार आहे.

बेळगावमधील राणी पार्वतीदेवी महाविद्यालयात सकाळी ७ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून २५ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी तयारी पूर्ण केली असून बेळगावच्या खासदारपदी कुणाची वर्णी लागणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

गेल्या ५ निवडणुकीत भाजपचे वर्चस्व असलेल्या बेळगाव लोकसभा मतदार संघात यंदा काँग्रेसने भाजपाला कडवे आव्हान दिले आहे. मतदार संघ पिंजून काढत मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचाराचा धुराळा काँग्रेसने प्रचाराच्या पहिल्या टप्प्यापासूनच उडविला होता. त्यातच कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या पाच हमी योजना या काँग्रेससाठी जमेची बाब ठरल्या.

ग्रामीण विधानसभा मतदार संघात बहुमताने विजयी ठरलेल्या काँग्रेसच्या आमदार आणि विद्यमान मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गेल्या दशकात ग्रामीण भागात निर्माण केलेले आपले वर्चस्व आणि यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांच्याबाजूने असलेला मतदारांचा कौल यामुळे या निवडणुकीत भाजपाला आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागल्याचे दिसून आले.Counting

दुसरीकडे भाजपासाठी देशभरात चांगले वातावरण असूनही सुरुवातीच्या टप्प्यात बेळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार जगदीश शेट्टर यांना स्थानिक भाजप नेत्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले. बाहेरचा उमेदवार असा शिक्का पडल्याने निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात जगदीश शेट्टर यांना भाजपच्या अंतर्गत राजकारणाला बळी पडावे लागले. माजी मुख्यमंत्री, सभापती असा मोठा राजकीय अनुभव असूनही जगदीश शेट्टर यांना सुरुवातीच्या टप्प्यात ‘गो बॅक शेट्टर’ या मोहिमेमुळे म्हणावा तसा मतदार संघ पिंजून काढता आला नाही. नाराजांची मनधरणी करून वरिष्ठांकडून कानपिळी केल्यानंतरच भाजपने खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात केली. प्रचार सभा, जाहीर मेळावे आणि पंतप्रधानांचा बेळगाव दौरा याच बरोबर देशात असलेली मोदी लाट, हिंदुत्व आणि राम मंदिराचा मुद्दा या मुद्द्यांवरच भाजपने ही निवडणूक लढविली.

एकीकडे वर्चस्व आणि दुसरीकडे प्रतिष्ठा अशी लढत झालेल्या बेळगाव लोकसभा मतदार संघात दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी जोरदार कस लावून निवडणूक रणधुमाळी गाजवली आहे.

बेळगाव मतदार संघाची निवडणूक ही पक्षाच्या मुद्द्यावर लढली गेली नसून वर्चस्व आणि प्रतिष्ठा या दोन मुद्यावरच अधिक लढली गेल्याचे चित्र दिसून आले. हेवे-दावे-आरोप-प्रत्यारोप-टीका-प्रतिटीका या गोष्टींमध्ये रंगलेल्या या निवडणुकीचे अंतिम स्वरूप उद्या स्पष्ट होणार असून जगदीश शेट्टर कि मृणाल हेब्बाळकर यांच्याकडे बेळगावच्या खासदारपदाची धुरा जाणार याकडे बेळगावकरांचे लक्ष वेधले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.