बेळगाव लाईव्ह :शहरातील फूटपाथवर वाहने पार्क करणे अथवा चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलेला असतानाही कोल्हापूर सर्कल ते केएलई हॉस्पिटलपर्यंतच्या फूटपाथवर मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने पार्क करण्याचा प्रकार सुरूच असून रहदारी पोलिसांनी याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे.
कोल्हापूर सर्कल ते केएलई हॉस्पिटलपर्यंतच्या फुटपाथची निर्मिती झाल्यापासून सदर फूटपाथ अर्थात पदपथ पादचाऱ्यांसाठी आहे की दुचाकी वाहन चालकांच्या सोयीसाठी? असा प्रश्न कायम उपस्थित होत असतो. कारण चिरमुरे गोळा करण्यात व्यस्त असणाऱ्या रहदारी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हा फूटपाथ सर्रासपणे दुचाकी वाहने पार्क करण्यासाठी वापरला जातो.
कोल्हापूर सर्कल ते केएलई हॉस्पिटलपर्यंतच्या रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते. अशा परिस्थितीत फुटपाथ दुचाकी वाहनांनी व्यापला जात असल्यामुळे पादचाऱ्यांना गैरसोय व अपघाताचा धोका पत्करत रस्त्यावरून ये -जा करावी लागते.
फूटपाथवर पार्किंग करू नये असा आदेश पोलीस प्रशासनाने नुकताच जारी केला आहे. मात्र या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावत दुचाकी वाहन चालक निर्धास्तपणे कोल्हापूर सर्कल ते केएलई हॉस्पिटलपर्यंतच्या फूटपाथवर आपली वाहने पार्क करत आहेत.
तेंव्हा संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर रस्त्याच्या फुटपाथ वरील पार्किंगला आळा घालावा. फुटपाथवर वाहने पार्क करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सदर रस्त्याचा वापर करणारे पादचारी व जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.