बेळगाव लाईव्ह :नियमांचे उल्लंघन करत ज्यादा शाळकरी मुले भरून घेऊन जाणाऱ्या वर्दीच्या 30 हून अधिक ऑटो रिक्षा चालकांवर आज शनिवारी सकाळी रहदारी दक्षिण विभाग पोलिसांनी मोठी कारवाई करत त्यांच्या रिक्षा जप्त केल्या.
बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बनिंग यांनी रहदारी नियम पालना संदर्भात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पोलीस प्रशासनाकडून शहरातील फूटपाथवर वाहने पार्क करण्यासाठी निर्बंध घालण्यात आला असून त्या अनुषंगाने कारवाई सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे वन-वे, चुकीचे नंबर प्लेट्स, ध्वनी प्रदूषण करणारे सायलेन्सर या संदर्भातही कारवाई केली जात आहे.
शालेय विद्यार्थी वाहतूक रिक्षांबाबत देखील पोलिस आयुक्तालयाकडून महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवासी ऑटो रिक्षातून 3 पेक्षा अधिक प्रवासी असू नयेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा आकडा 5 पेक्षा अधिक असू नये असा आदेश जारी करण्यात आला आहे. तथापि त्यानंतरही वर्दीवाले रिक्षा मामा आपल्या रिक्षांमध्ये अधिक मुलांची वाहतूक करत आहेत. याची गांभीर्याने दखल घेत रहदारी दक्षिण विभाग पोलिसांनी आज सकाळी शालेय मुलांना घेऊन जाणाऱ्या वर्दीवाल्या ऑटोरिक्षा चालकांविरुद्ध मोहीम उघडली होती.
या मोहिमेअंतर्गत रहदारी पोलिसांनी आज सकाळी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षा अडवून शहानिशा केली असता 30 हून अधिक ऑटोरिक्षा चालक पाचपेक्षा अधिक मुलांची वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी संबंधित रिक्षाचालकांवर गुन्हा नोंदवून त्यांच्या ऑटो रिक्षा जप्त केल्या.
बेळगाव शहर पोलीस आयुक्तालय अत्यार येथील शाळांना रिक्षांबाबत महत्त्वाची सूचना करण्यात आली आहे. पालकांमध्येही जागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे रिक्षातून मुलांना घेऊन जाताना पाच पेक्षा अधिक मुले असणार नाहीत याची खबरदारी घेण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. मुलांना रिक्षातून पाठविताना किंवा घेऊन येताना रिक्षा चालकाकडून रिक्षा बाबत खबरदारी घेतली जात आहे का? याची शहानिशा केली जावी.
रिक्षामध्ये ज्यादा मुलांमुळे अपघात किंवा मुलांचा श्वास कोंडला जाऊ शकतो. नियम न पाळणाऱ्या ऑटो रिक्षातून मुलांना न पाठवण्याची खबरदारी घेतली जावी. एकंदर ऑटो रिक्षा मधून मुलांना पाठविताना नियमावलीचे पालन होणे जरुरीचे आहे, असे पोलीस आयुक्तालयाकडून कळविण्यात आले आहे.