बेळगाव लाईव्ह :पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन घाटातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे किंवा दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन तिलारी घाटातील अवजड वाहनांची वाहतूक येत्या 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत बंद करण्याचा आदेश कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे.
तसेच या मार्गाला पर्याय म्हणून आंबोली व बेळगाव जिल्ह्यातील चोर्ला घाटाचा पर्याय म्हणून वापर करता येणार असल्याचे आदेशात नमूद आहे.
चंदगड तालुक्यात तसेच तिलारी घाटामध्ये पावसाळ्यात अतिवृष्टी होत असल्याने घाटातील बऱ्याच ठिकाणी संरक्षक कठडे जीर्ण आणि नादुरुस्त अवस्थेत आहेत. याखेरीज दरड कोसळण्याचा धोकाही नाकारता येत नाही. तिलारी घाट अरुंद असल्याने या घाटात वारंवार अपघात होतात.
हा घाट अवजड वाहतुकीस धोकादायक असून घाटातील तीव्र चढ-उतारांमुळे वळणावर वाहन चालकांची कसरत होते. त्यामुळे अनेक अपघात अपघात झाले आहेत. गुगल मॅपवर बेळगावहून गोव्याला जाणारा जवळचा रस्ता म्हणून तिलारी घाट दिसतो.
त्यामुळे वाहनचालक या मार्गाने जात असले तरी घाटाचा अंदाज चालकाला येत नाही. त्यामुळे अपघात व वाहने घाटामध्ये अडकून पडण्याच्या घटना घडतात. बस अपघात होऊन प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो, असे संभाव्य धोके टाळण्यासाठी तिलारी घाट मार्गे होणारी अवजड वाहतूक येत्या 31 ऑक्टोबर अखेरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने तिलारी रामघाटातून होणारी एसटी बस वाहतूक 31 ऑक्टोबरपर्यंत बंद करून ती आंबोली मार्गे वळवली आहे.
याची अंमलबजावणी सुरू झाली असून बेळगाव, कोल्हापूर, इचलकरंजी, गडहिंग्लज आदी भागात जाणाऱ्या एसटी गाड्या आता आंबोली मार्गे जाणार आहेत.