बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या खासदारपदी निवडून आलेले जगदीश शेट्टर हे उद्या, १३ जून रोजी बेळगावला येणार आहेत. बेळगावमधील विविध ठिकाणी भेट देऊन मतदार आणि भाजप कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन आभार व्यक्त करणार आहेत. याचप्रमाणे बेळगावमधील पुढील वाटचालीबद्दलही ते चर्चा करणार आहेत.
मूळचे हुबळीचे असणारे खासदार शेट्टर यांना बेळगावमधून उमेदवारी देण्यात आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. त्यानंतर बेळगावच्या विकासाची जबाबदारी आपण घेण्यासाठी सक्षम असल्याचे आश्वासन जगदीश शेट्टर यांनी दिले होते.
आता जनतेने त्यांना खासदार म्हणून निवडून आपला कौल दिला आहे. यामुळे आगामी काळात बेळगावच्या विकासासाठी जगदीश शेट्टर कोणत्या उपाययोजना राबविणार? ४० वर्षांच्या राजकारणातील ३० वर्षांचा बेळगावशी संबंध मुख्यमंत्री, विविध खात्यांचे मंत्री आणि सभापती म्हणून काम पाहिलेल्या अनुभवातून बेळगावच्या विकासात कोणते योगदान देणार?
आजतागायत बेळगावमधून हुबळी धारवाडला गेलेले प्रकल्प, महत्वाकांक्षी योजना आणि प्रामुख्याने बेळगाव विमानतळावरील उडाण योजना पूर्ववत सुरु करण्यात जगदीश शेट्टर यशस्वी ठरतील का? याबाबत ते कोणती भूमिका घेतील? याकडे बेळगावकरांचे लक्ष वेधले आहे.