बेळगाव लाईव्ह : फेब्रुवारी महिन्यात बेळगाव महानगरपालिकेच्या गोवावेस येथील विभागीय कार्यालयात चोरीचा प्रकार झाल्याचे उघडकीस आले होते.
त्यानंतर पुन्हा सहा महिन्याच्या आत दुसऱ्यांदा याच कार्यालयात चोरी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मागीलवेळी चोरी होऊनही सतर्कता न बाळगल्याने पुन्हा एकदा चोरीचा प्रकार घडल्याने नागरिकांकडून ताशेरे ओढण्यात येत आहेत.
यासंदर्भात अधिक माहिती अशी कि, गोवावेस येथील मनपा इमारतीत असलेल्या महानगर निगम बेळगाव महसूल विभागाच्या इमारतीत दक्षिण विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक १ ते २६ चा कारभार चालतो. रविवारी दिवसभर सुट्टी असल्याने चोरट्यांनी डाव साधला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मागील वेळी देखील रविवारची सुट्टी साधूनच चोरी करण्यात आली होती. एकंदर चित्र पाहता महसूल विभागातील कागदपत्रांची चोरी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.याचप्रमाणे महत्वाची कागदपत्रे विस्कटलेल्या स्थितीत दिसत आहेत.
येथील कर्मचाऱ्यांनी एक लॅपटॉप चोरीला गेल्याची माहिती दिली असून हा प्रकार लक्षात येताच कर्मचाऱ्यांना दिवसभर बाहेर थांबावे लागल्याची वेळ आली.
पहाटेच्या सुमारास मुख्य दरवाजाच्या बाजूला असलेल्या खिडकीतून चोरटयांनी आत प्रवेश करून चोरी करून पुन्हा पूर्ववत दरवाजा बंद करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रविवारची सुट्टी संपवून आज कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनात हि बाब येताच टिळकवाडी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
यावेळी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला. या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून पुढील तपास हाती घेण्यात आला आहे. सातत्याने एकाच इमारतीत दोनवेळा चोरी झाल्याने यामागे नेमका कुणाचा हात आहे? चोरीचा उद्देश काय आहे? असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.