बेळगाव लाईव्ह : टेंगिनकेरा गल्लीत महापालिकेच्या जुन्या दवाखान्याच्या इमारतीत सुरू असलेली व्यायामशाळा आणि महिला मंडळाचे कार्यालय बंद करण्यासाठी गुरुवारी मनपा अधिकारी दाखल झाले होते.
मनपा अधिकाऱ्यांना यावेळी स्थानिकांनी विरोध केला. यावेळी तीन दिवसांत कागदपत्रे सादर करण्याची मुदत देऊन अधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला होता. त्यानंतर आज टेंगिनकिरा गल्लीतील राजगुरू युवक संघाने मनपा आयुक्तांना निवेदन सादर केले असून सदर जागा राजगुरू युवक संघाच्या नावाने हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे.
या जागेत या भागातील नागरिकांचे अनेक घरगुती, सामाजिक कार्यक्रम आयोजिले जातात. या जागेचा कोणत्याही प्रकारे गैरवापर होत नसून सदर जागा भविष्यात देखील अशाचपद्धतीने वापरली जाईल, अशी ग्वाही देत मनपा आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी गटनेते मुजम्मील डोणी यांनी टेंगिनकेरा गल्लीत आरोग्य विभागाच्या बंद पडलेल्या दवाखान्याच्या जागेत काहींनी व्यायामशाळा सुरू केली आहे. तर एका मजल्यावर महिला मंडळाचे कार्यालय आहे. या प्रकारामुळे महापालिकेचा महसूल बुडत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी या जागेची पाहणी करून निर्णय घेण्याचा आदेश महसूल विभागाला बजावला होता.
आज सकाळी महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांनी इतर अधिकाऱ्यांसह टेंगिनकेरा गल्लीत जाऊन इमारतीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी व्यायामशाळेला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. पण, स्थानिकांनी त्यांना विरोध केला. अनिल बेनके आमदार असताना ही इमारत व्यायामशाळेसाठी देण्यात आली आहे. आमचे म्हणणे ऐकून न घेता, तुम्हाला इमारतीला टाळे ठोकता येणार नाहीत, असे सांगितले. त्यामुळे उपायुक्त तालिकोटी यांनी अखेर स्थानिकांना या इमारतीबाबत स्थानिक युवक मंडळाकडे असलेली कागदपत्रे सादर करण्यात यावीत, अशी सूचना त्यांनी करत तेथून माघार घेतली होती.
टेंगिनकेरा गल्लीतील इमारतीला महापालिकेने टाळे ठोकू नये, ती स्थानिकांना व्यायामशाळा आणि महिला मंडळासाठी द्यावी, यासाठी गल्लीतील रहिवाशांनी राजगुरू युवक संघाच्या माध्यमातून मनपा आयुक्तांना निवेदन सादर केले.