बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिका व्याप्तीतील मालमत्ताधारकांना, घरपट्टी भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत ५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेळगाव महानगरपालिकेतील मालमत्ता कर वसुलीबाबत महापालिका आयुक्त पी. लोकेश आणि महसूल निरीक्षक गुरुनाथ दड्डे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
मात्र मे महिन्यापासून विनासवलत घरपट्टी भरलेल्या मालमत्ताधारकांना सवलतीचा लाभ मिळाला नाही. अनेकांनी विनासवलत घरपट्टी भरली असून या मालमत्ताधारकांना रक्कम परत मिळणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
सरकारने शहरातील मालमत्ताधारकांना मोठा दिलासा देत ५ टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून घरपट्टी भरणाऱ्या मालमत्ताधारकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये घरपट्टी भरणाऱ्या मालमत्ताधारकांना दरवर्षी ५ टक्के सवलत दिली जाते. यावर्षीही ही सवलत लागू होती.
मात्र ऑनलाईन प्रणालीतील समस्या तसेच चलन वेळेत न मिळाल्याने सवलतीचा लाभ काही दिवसच मिळाला. दरम्यान नागरिकांनी सवलत वाढविण्याची मागणी केली. या मागणीला अनुसरून मनपाने बेंगळूरच्या नगरविकास खात्याकडे प्रस्ताव पाठविला. या प्रस्तावावर सरकारने लवकर निर्णय घेतला नाही परिणामी मे महिन्यापासूनच अनेक नागरिकांनी विनासवलतच कर भरला.
जून महिन्यात पुन्हा ५ टक्के सवलतीचा आदेश सरकारने मनपाला दिला असून यानुसार आता ३१ जुलैपर्यंत सवलतीचा लाभ घेता येणार आहे. महानगरपालिकेतर्फे पहिल्या महिन्यात घरपट्टी भरणाऱ्या करदात्यांना पाच टक्के सवलत दिली जाते. त्याचा लाभ घेण्यासाठी बरेच जण धडपडतात. मात्र यंदा निर्माण झालेल्या समस्यांमुळे सवलतीपासून अनेकजण वंचित राहिले.
पुन्हा सवलतीमध्ये वाढ केल्याने नागरिकांसह महानगरपालिकेलाही लाभ होणार आहे. मात्र दुसरीकडे मे महिन्यामध्ये तसेच आतापर्यंत भरलेल्या करदात्यांना पाच टक्के सवलत मिळणार का याबाबत आदेशामध्ये कोणतीही बाब नमूद करण्यात आलेली नाही.
ज्यांनी आधीच विनासवलत कर भरला आहे त्यांना त्यांची रक्कम परत मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मनपा आयुक्त आता या प्रश्नाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहणार? विनासवलत कर भरलेल्या मालमत्ताधारकांना कोणता दिलासा देणार? याकडे लक्ष वेधले आहे.